अमरावती : अमरावती विभागातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या मध्य प्रदेश सीमेवर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, धरणाची तीन दारे गुरूवारी दुपारी एक वाजता उघडण्यात आली. त्यामुळे वर्धा नदीकाठच्या ग्रामस्थांना व मासेमारी करणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अप्पर वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान तसेच येणाऱ्या येव्याच्या परीगणना नुसार प्रकल्पाच्या जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. प्रकल्पाच्या धरण परिचालन सूची नुसार नियोजित पाणी पातळी ठेवण्याकरिता धरणाचे तीन वक्रद्वार दहा सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामधून ४८.२५ घ.मी.प्र.से एवढा विसर्ग वर्धा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे.
नदी काठावरील गावकऱ्यांनी तसेच नदीपात्रातून ये-जा करणाऱ्या सर्व संबंधीतानी स्वतःची काळजी घ्यावी, असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्र ओलांडू नये. शेतीची अवजारे नदीपात्रात ठेवू नये. जनावरांना नदीपात्र ओलांडू देऊ नये आणि वर्धा नदी पात्रामध्ये मासेमारी करण्यात येऊ नये, अशी सूचना देण्यात आली आहे.
जलाशयात येणारा येवा पाहून जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे. सर्व यंत्रणांनी आवश्यक ती संपूर्ण खबरदारी बाळगावी, असे सांगण्यात आले आहे.
अप्पर वर्धा धरण प्रशासनाच्यावतीने २७ ऑगस्ट रोजी अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर येथील जिल्हाधिकाऱ्यांना एक सूचनापत्र रवाना करण्यात आले होते. त्याची प्रत मोर्शी, तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, बाभूळगाव, देवळी येथील गटविकास अधिकारी तसेच पोलीस प्रशासनालासुद्धा पाठविण्यात आली होती. मोर्शीपासून आठ किमी अंतरावर असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तसेच जलालखेडा येथून वाहत असलेल्या वर्धा नदीला मोठा महापूर आल्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वर्धा नदीखालील भागातील नदी-नाल्यांचा विसर्ग नदीपात्रामध्ये राहणार राहण् पाणीपातळीमध्ये असल्यामुळे आणखी वाढ होण्याची शक्यता बघता आणि अपेक्षित पर्जन्यमानाचा विचार करता तसेच धरणातून विसर्ग वर्धा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
दरम्यान, अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कोसळत असल्यामुळे मध्य प्रदेशातून जाम व माडू नदी तुडुंब भरून वाहत असल्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ होत आहे. धरणाचा जलसंचय ९१.५९ टक्के एवढा झाला आहे. धरणाची पाणीपातळी ३४१.९७ मिलिमीटर पर्यंत होती.