नागपूर: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २२ एप्रिल रोजी नागरी सेवा अंतिम निकाल २०२४ जाहीर केला. या वर्षी शक्ती दुबे यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. विदर्भातील यावर्षी अनेक विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवले आहे. यामध्ये सर्वेश बावणे रँक ५०३, नम्रता ठाकरे रँक ६७१, श्रीतेश पटेल रँक ७४६, शिवांक तिवारी ७५२ या उमेदवारांनी बाजी मारली आहे.

देशात हर्षिता गोयल दुसऱ्या स्थानावर आहे आणि पुणे येथील अर्चित डोंगरे तिसऱ्या स्थानावर आहे. यात विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. नागपूरच्या नम्रता ठाकरे यांनी बाजी मारली आहे. त्यांना ६७१ रँक मिळाली आहे. मूळच्या वरुड तालुक्यातील असून संपूर्ण शिक्षण नागपूर येथे झाले आहे. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२४ ला बसलेले उमेदवार आता त्यांचे अंतिम निकाल पाहू शकतात. यूपीएससीने अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

किती उमेदवारांची शिफारस करण्यात आली?

भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) आणि केंद्रीय सेवा, गट ‘अ’ आणि गट ‘ब’मध्ये नियुक्तीसाठी एकूण १,००९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

३३५ उमेदवार सामान्य श्रेणीतील आहेत. ज्यामध्ये १० पीडब्ल्यूबीडी-१, ५ पीडब्ल्यूबीडी-२, ११ पीडब्ल्यूबीडी-३ आणि ५ पीडब्ल्यूबीडी-५ उमेदवारांचा समावेश आहे. १०९ उमेदवार ईडब्ल्यूएस (आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग) श्रेणीतील आहेत. ज्यात १ पीडब्ल्यूबीडी-१ आणि १ पीडब्ल्यूबीडी-२ यांचा समावेश आहे. ३१८ उमेदवार ओबीसी प्रवर्गातील आहेत. १६० उमेदवार अनुसूचित जाती (अनुसूचित जाती) प्रवर्गातील आहेत. ८७ उमेदवार अनुसूचित जमाती (अनुसूचित जमाती) श्रेणीतील आहेत. यातील उत्तीर्ण उमेदवारांनी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरचे संचालक प्रमोद लाखे यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे मुलाखतीचे प्रशिक्षण घेतले होते. त्याचा या उमेदवारांना मोठा फायदा झाला आहे.

विदर्भातील गुणवंत

(१) जयकुमार आडे (३००रँक)

(२) श्रीरंग कावरे (३९६ रँक)

(३) राहुल आत्राम (४८१ रँक)

(४) सर्वेश बावणे (५०३रँक)

(५) सावी बालकुंडे (५२७रँक)

(६) सौरभ यावले (६६९रँक)

(७) नम्रता ठाकरे (६७१ रँक)

(८) सचिन बिसेन (६८८ रँक)

(९) भाग्यश्री नैकाले (७३७रँक)

(१०)श्रीतेश पटेल (७४६रँक)

(११) शीवांक तिवारी(७५२रँक)

(१२) अपूर्व बालपांडे (६४९ रँक)