नागपूर : अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना अडचणीत आणणारा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. भारतीयांकडून मागणी असलेल्या एच-१ बी व्हिसासाठी आता १ लाख डॉलर्स म्हणजेच साधारण ८८ लाख रुपये इतकं वार्षिक शुल्क आकारण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे.

यामुळे तीन लाख भारतीयांना शुल्कवाढीचा फटका बसणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारपासून एच-१बी व्हिसावर वार्षिक १ लाख डॉलर्सचे शुल्क लावण्याची घोषणा करताच अमेरिकेतील भारतीय कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असल्याने अनेकांनी मायदेशी परत येण्यासाठी आगाऊ तिकीट काढून ठेवले होते. मात्र, त्यांच्या कंपन्यांनी मायदेशी परत जाण्यास तुर्तास मज्जाव केल्याने भारतीय कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

विदर्भातील आणि मुख्यतः नागपुरातील अनेक तरुण हे अमेरिकेमधील आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीला आहेत. २१ ऑक्टोबरला दिवाळी असल्याने त्यांनी भारतात येण्याचा बेत आखला होता. न्यूयॉर्क येथील एक आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीला असणाऱ्या नागपूरच्या सलोनी भोयर यांनी सांगितले की, दिवाळीनिमित्त नागपुरात परत येण्यासाठी त्यांनी तीन महिन्यांआधी तिकिटे काढली.

मात्र, ट्रम्प यांच्या नवीन व्हिसा नियमामुळे कंपनीने सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना ई-मेल करून कुणीही अमेरिका सोडून मायदेशी परत जाऊ नये असे सुचवले आहे. जे कर्मचारी परत जातील त्यांच्या वेतनातूनच व्हिसासाठी एक लाख डॉलर्सचा खर्च स्वत: करावा लागेल, असे ई-मेलमध्ये नमूद आहे. यामुळे सर्व भारतीय कर्मचाऱ्यांसमोर मोठा पेच उभा ठाकल्याचे सलोनी यांनी सांगितले. दिवाळीनिमित्त मायदेशी परत जाण्याची सर्व तयारी केली होती. मात्र अचानक अमेरिकन सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्यासोबत असणाऱ्या अनेक भारतीयांचाही हिरमोड झाल्याचे त्या म्हणाल्या.

आंतरराष्ट्रीय विमानाच्या तिकिट दरात तीनपट वाढ

अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीवर असलेल्या आणि सध्या भारतात परत आलेल्या कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत अमेरिकेत परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्यथा, त्यांच्या एच-१बी व्हिसावर १ लाख डॉलरचे शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे भारतात असलेले अनेक कर्मचारी अमेरिकेला परत जाण्यासाठी तात्काळ विमानाचे तिकीट काढत असल्याने आंतरराष्ट्रीय विमानाच्या तिकिटांच्या दरात तीनपट वाढ झालेली आहे. ५० हजार रुपये तिकीट असणाऱ्या ब्रिटिश एअरलाईनचे तिकीट दर आता दीड लाख रुपयापर्यंत तर कतार एअरलाईनचे तिकीट एक लाख ५४ हजार रुपयापर्यंत गेले आहे.

हैदराबाद दुतावासात गर्दी

भारतात परत आल्यावर पुन्हा अमेरिकेत परत जाण्यापूर्वी पारपत्र आणि व्हिसा अद्ययावत करणे सर्वांना क्रमप्राप्त असते. यासाठी विदर्भातील भारतीय कर्मचाऱ्यांना हैदराबाद येथील अमेरिकेच्या वाणिज्य दुतावासात पारपत्र अद्ययावत करण्यासाठी आगाऊ नोंदणी करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांना नोव्हेंबरमधील तारखाही मिळाल्या होत्या. अचानक अमेरिकेने असा निर्णय घेतल्याने जे कर्मचारी भारतात आहेत त्यांनी व्हिसा अद्ययावत करण्यासाठी हैदराबाद दुतावासाकडे धाव घेतली आहे.