वर्धा: बँकिंग क्षेत्र अत्यंत जोखमीचे झाल्याचे म्हटल्या जाते. कर्जबुडव्यांनी अनेक बँका रसातळास गेल्याची विविध उदाहरणे आहेत. शहरी भागातील असे चित्र असतांना ग्रामीण भागात कार्यरत सहकारी बँकाना पण घरघर लागल्याचे दिसून येत आहे. अशी बँकिंग क्षेत्राची चिंताजनक स्थिती दिसून येत असतांना मूठभर बँका मात्र कामगिरीने उजळत निघत असल्याचे आशादायी चित्र आहे. या अश्या बँकात एक बँक ग्रामीण भागात कार्यरत असूनही उज्ज्वल कामगिरी बजावत आहे.
हिंगणघाट येथील वणा नागरिक सहकारी बँकेची ही यशस्वी वाटचाल आहे. या बँकेस पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार प्राप्त झाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार पटकवणारी ही पहिली बँक ठरली आहे. दि महाराष्ट्र स्टेट को – ऑप बँक असोसिएशन तर्फे हे पुरस्कार देण्यात येतात. वणा बँक ही नागपूर विभागात अडीचशे कोटी रुपयांपर्यंत ठेवी असणाऱ्या बँकात अव्वल ठरली आहे. मुंबईत संपन्न कार्यक्रमात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार बँकेचे अध्यक्ष सुधीर कोठारी यांनी स्वीकारला. सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मनोगत व्यक्त करतांना कोठारी म्हणाले की वसंतदादा यांच्या नावे असलेला हा पुरस्कार प्राप्त होणे ही गौरवाची बाब ठरते. बँकेच्या चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात असणाऱ्या बहुतांश शाखा ग्रामीण भागात आहे. शेतकऱ्यांनी टाकलेला विश्वास ही आमची खरी तिजोरी आहे. गरजू लोकांच्या सेवेस आम्ही सदैव तत्पर आहोत म्हणून खातेदार पण विश्वास टाकतात, असे कोठारी म्हणाले.
बँकेच्या विविध जबाबदाऱ्या संचालक मंडळाने वाटून घेतल्याचे सांगितल्या जाते. मंडळात डॉ. निर्मेश कोठारी, सुरेश सायंकार, ओमप्रकाश डालिया, डॉ. दिलीप जोबनपुत्रा, हिम्मत चतुर, विपीन पटेल, अक्षय ओसवाल, सुरेश नैनानी, अविनाश गांधी, डॉ. वरूण लोढा, मनीष चितलांगे, ज्ञानेश्वर लोणारे, सिद्धार्थ दारून्डे, विद्या भोयर, पूनम बादले आदींचा समावेश आहे. या सर्वोच्च पुरस्काबद्दल बँकेचे अध्यक्ष सुधीर कोठारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केल्या जात आहे. बँकेच्या हिंगणघाट, वर्धा, समुद्रपूर, सिंदी, कानगाव, अल्लीपूर, वडनेर, मांडगाव, भद्रावती, राळेगाव व माढेळी या ठिकाणी शाखा असून सर्व शाखाच्या कामगिरीमुळे बँकेस हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे म्हटल्या जात आहे.