मलकापूर: नागपुर-पुणे मार्गे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला विदर्भ पंढरी शेगावमध्ये थांबा मिळाला असून यासंदर्भातील परिपत्रक रेल्वे विभागाच्या वतीने काढण्यात आले आहे. १० ऑगस्ट रोजी ‘वंदे भारत ट्रेन’ चे उदघाटन होणार आहे. शेगाव मध्ये थांबा मिळाल्याने भाविकांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. यासाठी, केंद्रीय आयुष्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सतत प्रयत्न व पाठपुरावा केला.

वंदे भारत रेल्वे सुरु करण्यासंदर्भात व शेगावला थांबा मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. त्यानंतर हे परिपत्रक निर्गमित झाले आहे. देशांतर्गत रेल्वे सेवेला गतीमान करण्याच्या दृष्टीकोनातुन भारत सरकारने वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू केली आहे. प्रवाशांना आधुनिक सुविधा देणारी भारतीय बनावटीची वंदे भारत रेल्वे प्रवाश्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. नागपुर ते पुणे हे दोन महानगर वंदे भारत रेल्वे मार्गाने जोडण्याचे काम केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाने केले.

हे आहेत थांबे

पहिल्या परिपत्रकामध्ये अजनी, नागपुर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगांव, मनमाड, कोपरगांव, अहिल्यानगर, दौंड मार्गे पुणे असे प्रवास थांबा मंजुर करण्यात आले होते. विदर्भाची पंढरी म्हणुन ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे देशभरातुन भाविक येत असतात. नव्याने सुरु होत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला शेगाव येथे थांबा मिळावा, यासाठी केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रिय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती. शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानची माहिती देऊन या थांब्याचे महत्त्व पटवून दिले होते.

असे आहे वेळापत्रक

नागपुर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला १० ऑगस्ट रोजी प्रारंभ होणार आहे. ही गाडी आठवडयातुन ६ दिवस चालणार आहे नागपुर येथुन सकाळी ९.५० वाजता निघणार आहे. वर्धा, बडनेरा, अकोला, मार्गे दुपारी १.२० च्या सुमारास शेगावात दाखल होईल. त्यानंतर पुढील प्रवासासाठी रवाना होईल. पुण्यावरुन येताना दुपारी २.४५वाजता शेगाव येथे ही रेल्वे थांबणार आहे. नागपुर-पुणे हे ८८४ किलो मिटरचे अंतर वंदे भारत एक्सप्रेस अवघ्या १० तासात पुर्ण करणार आहे.