अकोला : वसुबारस गोमातेची पूजा करण्याचा पवित्र दिवस. त्याच दिवशी शहरातील बैदपुरा भागात गोमांस विक्री होत असल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकल्यावर समाजकंटकांनी तणावाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे किंवा इतर पद्धतीने दबाव टाकण्याचा प्रकार कदापी सहन केला जाणार नाही. कोणत्याही जाती किंवा धर्मावर नव्हे तर दोषी समाजकंटकांवर कारवाई केली जाईल, असे खासदार अनुप धोत्रे यांनी स्पष्ट केले.
शहरातील बैदपुरा भागात गोमांस विक्री प्रकरणात शुक्रवारी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर दोन गटात मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणात खासदार अनुप धोत्रे यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी आमदार रणधीर सावरकर, जयंत मसने, विजय अग्रवाल, भरत मिश्रा, करण शाहू, संजय गोटफोडे, पवन महाले, प्रकाश धोगलीया आदींसह पदाधिकारी व हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गायी चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. गोवंश चोरीचे अनेक प्रकार शहरासह जिल्ह्यात उघडकीस आले असून सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. आज बैदपुरा येथे गोवंशाची मांस विक्रीचे प्रकार उघडकीस आले. पोलीस व बजरंग दलाचे कार्यकर्ते त्याठिकाणी गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, असे खासदार अनुप धोत्रे म्हणाले.
या समाजकंटकांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांचे अवैध व्यवसाय कायम स्वरूपी बंद होणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस व महापालिका प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल. कुठल्याही जाती, धर्मावर नव्हे तर समाजकंटकांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले.
अकोला : वसुबारस सणाच्या दिवशी शहरातील बैदपुरा भागात गोमांस विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खासदार अनुप धोत्रे म्हणाले, "पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकल्यावर समाजकंटकांनी तणावाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे किंवा इतर… pic.twitter.com/ycj577KNqt
— LoksattaLive (@LoksattaLive) October 17, 2025
गोमातेचे रक्षण हा आमचा धर्म आणि संस्कार आहे. या प्रकारच्या घृणास्पद कृत्यांवर कठोरात कठोर कारवाई प्राधान्याने केली जाईल. या प्रकरणात गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. गोमातेचा अवमान करणाऱ्यांना माफी नाही. कायद्याच्या चौकटीत राहून कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. महायुतीच्या काळामध्ये हे प्रकार सहन केल्या जाणार नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले. दरम्यान, ऐन सणासुदीच्या दिवसांत दोन गटातील वादातून निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे खळबळ उडाली होती.