scorecardresearch

संत साहित्याचा संस्कृतमध्ये अनुवाद झाला तरच भारत विश्वगुरू! सरसंघचालकांचे प्रतिपादन

संत साहित्य हे अनुभव व प्रात्यक्षिकावर आधारित आहे तर पंथ साहित्य ते विद्वानांचे आहे. संत साहित्यामध्येही जे सत्य आहे तेच सांगितले आहे.

संत साहित्याचा संस्कृतमध्ये अनुवाद झाला तरच भारत विश्वगुरू! सरसंघचालकांचे प्रतिपादन

नागपूर : महाराष्ट्रासह तामिळनाडू, गुजरात अशा सर्वच राज्यांमध्ये अनेक संत होऊन गेले. या सगळ्याच प्रांतांमध्ये संस्कृतचा अभ्यासही होतो. त्यामुळे येथील संत साहित्याचा संस्कृतमध्ये अनुवाद झाला तरच भारत विश्वगुरू होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. भारत विश्वगुरू होणे ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>> नागपूर : उपराजधानीत आकर्षक चित्रांनी सुशोभित भिंती पुन्हा काळवंडण्याच्या मार्गावर

अभ्यंकरनगर नागरिक मंडळ संत ज्ञानेश्वर मंदिर, बजाजनगरच्या वतीने प्रसिद्ध संस्कृत साहित्यिक व कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी ज्ञानेश्वरीचे संस्कृतमध्ये अनुवाद केल्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरसंघचालक बोलत होते. ते पुढे म्हणाले की, हिंदुत्व म्हणजे सत्याचा सतत शोध घेणे, असे महात्मा गांधी म्हणायचे. आपल्याकडे प्रात्यक्षिकांच्या अनुभवावरच सर्व गोष्टींचा शोध घेतला जातो. संत साहित्य आणि पंथ साहित्यामध्येही हाच फरक आहे. संत साहित्य हे अनुभव व प्रात्यक्षिकावर आधारित आहे तर पंथ साहित्य ते विद्वानांचे आहे. संत साहित्यामध्येही जे सत्य आहे तेच सांगितले आहे.

हेही वाचा >>> मराठी नाटय़ परिषदेत ‘सभासद नाटय़’!, निवडणूक जिंकण्यासाठी खोटे अर्ज भरल्याची तक्रार

भारतातील अनेक राज्यांमध्ये असे संत होऊन गेले. त्यांनी आपापल्या भाषांमध्ये साहित्य निर्माण केले. काही साहित्याचे विविध भाषांमध्ये अनुवादही झाले. सगळ्या प्रातांमध्ये संस्कृतचा अभ्यास केला जातो. ज्ञानेश्वरीचे आज शेकडो वर्षांनी संस्कृतमध्ये अनुवाद झाले. काळाचे एक चक्र पूर्ण झाले. भारत ही भोगभूमी नाही तर कर्मभूमी आहे. त्यामुळे विविध प्रातांमध्ये असलेल्या संत साहित्याचे संस्कृतमध्ये अनुवाद केले तर आपण विश्वगुरू बनू, असे डॉ. भागवत म्हणाले. यावेळी डॉ. पेन्ना यांनीही ज्ञानेश्वरीच्या संस्कृत अनुवादाच्या प्रवासावर प्रकाश टाकला. यावेळी अभ्यंकरनगर नागरिक मंडळाचे अशोक गुजरकर, सचिव दिलीप भाटवडेकर उपस्थित होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 09:51 IST