नागपूर : शहरातल्या सोनेगाव, धंतोली, गणेशपेठ, राणा प्रतापनगरसह गोंदिया जिल्ह्यातून सहा वाहनांची चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील टोळीचा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने छडा लावत दोघांना बेड्या ठोकल्या. या टोळीतील आणखी दोन सदस्य फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
पोलिसांनी पकडलेली बालाघाट जिल्ह्यातील ही दुसरी वाहनचोर टोळी आहे. तहसील पोलिसांनी २ महिन्यांपूर्वी अशाच एका टोळीतील अटक करीत त्यांच्याकडून चोरीच्या २५ हून अधिक दुचाकी जप्त केल्या होत्या.
अतूल श्यामलाल भिसेन (२५, रा. परसवाडा, जिल्हा बालाघाट, मध्य प्रेदश) आणि यासीन अली गफ्फूर अली (४०, रा. कटंगी बालाघाट) अशी या वाहन चोर टोळीतील सदस्यांची नावे आहेत. यातला अतूल भिसेन हा टोळीचा म्होरक्या असून त्याने आणखी दोघांच्या मदतीने सोनेगाव , धंतोली, गणेशपेठ, राणा प्रतापनग पोलीस हद्दीतून प्रत्येकी १ आणि गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा येथूनही वाहने चोरल्याचे आढळले आहे.
नागपूर पोलिसांनी केलेल्या या अटक सत्राची कुणकूण लागताच मध्य प्रदेशातील वाहन चोर टोळीतील आणखी दोन सदस्य अरविंद आणि अंकीत मडावी हे दोघे फरार झाले असून पोलिस त्यांच्या मागावर लागले आहेत. वाहनचोर टोळीतले हे चौघेही मध्य प्रदेशातील कुख्यात गुन्हेगार असल्याचीही माहिती मिळत असून गुन्हे शाखेचे पथक मध्य प्रदेश पोलिसांच्या संपर्कात आहेत.
भिवापूर येथील रहिवासी आदित्य टाटू हे १९ सप्टेंबरला छत्रपती चौकातल्या मेट्रो स्टेशनवरून गाडी उभी करून गावी गेले होते. दुसऱ्या दिवशी ते परतले असता दुचाकी चोरी गेल्याचे त्यांना आढळले. आदित्य यांनी प्रतापनगर पोलिस ठाण्यात वाहनचोरीची तक्रार दाखल केली. त्या आधारे गुन्हे शाखा पथकातले पोलीस अंमलदार कुणाल गेडाम यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे घटनेचे तांत्रिक निरीक्षण करीत या आंतरराज्यिय वाहन चोर टोळीचा छडा लावला आहे. गुन्हे शाखेने अटक केलेल्या वाहन चोरांच्या टोळीकडून पोलिसांनी चोरीच्या ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.