नागपूरः गरबा उत्सव मंडळांनी त्यांच्या मांडवात वराह देवतेचे फोटो लावावे. वराह देवतेचे पूजन केल्यानंतरच गरबा करणाऱ्यांना प्रवेश द्यावा, असे फर्मान विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) मंडळांसाठी काढले आहे. शनिवारी नागपुरातील धंतोली येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत विहिंपने या वादग्रस्त विषयासह इतरही मागण्यांबाबतची माहिती दिली.

विश्व हिंदू परिषदेकडून प्रत्येक नवरात्रात गरबा उत्सव मंडळात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड पाहून, त्या व्यक्तीचा धर्म तपासूनच आत मध्ये प्रवेश देण्यात यावे, प्रवेश घेणाऱ्याच्या मस्तकावर टीळा लावण्यात यावा, देवी मातेचा पूजन करायला लावण्यात यावे या मागण्या केल्या जातात. परंतु यंदा गरबा उत्सव मंडळाच्या पंडाल मध्ये आयोजकांनी वराह देवतेचा फोटो लावण्याची आणि त्याच पूजन करायला लावण्याची नवीन मागणी करत तसे फर्मान गरबा व नवरात्र उत्सव मंडळांना दिले आहे. त्याबाबत शनिवारी नागपुरातील धंतोली येथे झालेल्या पत्रपरिषदेत विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री प्रशांत तितरे यांनी भाष्य केले आहे.

प्रशांत तितरे म्हणाले, काही विधर्मी वराहपासून घृणा करतात, त्यामुळे वराहदेवतेचा चित्र पाहून ते गरबा उत्सव मंडळापासून दूर राहतील. मुस्लिम तरुणांना डीवचण्यासाठी अशी मागणी करणे योग्य आहे का असा प्रश्न माध्यमाने विहिंप पदाधिकाऱ्यांना विचारल्यावर वराह देवता आणि नवरात्राचा तसा धार्मिक संबंध नसला, तरी ते आमचे देवता आहे, ते अवतार आहे आणि काही विधर्मीचे वराह दर्शन केल्याने धर्म नष्ट होते, त्यांचा धर्म खंडित होतो असा त्यांचा समज आहे, म्हणून आम्ही तशी अट घातल्याचादावाही विहिंपने केला. जे हिंदू धर्माला मानत नाही मूर्ती पूजेला मानत नाही, देवी मातेला मानत नाही, त्यांनी गरबा स्थळी प्रवेशच कशाला करावं, म्हणून आम्ही अशा सर्व अटी अट घातल्याचे विहिंपचे प्रशांत तितरे यांनी म्हटले.

अटींचे पालन करून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात…

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल चे कार्यकर्ते या अटींचे पालन करून घेण्यासाठी काय करणार याबाबत प्रशांत तितरे म्हणाले, वराह आमचा दैवत आहे, अवतार आहे, म्हणून त्यांचा चित्र तिथे असावे. या अटींचे पालन करून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात आमचे कार्यकर्ते गरबा व नवरात्र उत्सव मंडळांशी संपर्क करत आहेत. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलचे कार्यकर्ते प्रत्येक गरबा उत्सव मंडळात जातील आणि सर्व स्थितीवर तसेच असामाजिक तत्वांवर, विधर्मी लोकांवर नजर ठेवून राहतील. तिथे काही वेगळं दिसल्यास आयोजन मंडळाला संपर्क साधून ते दुरुस्त करण्यास सांगतील, त्यांनी न ऐकल्यास पोलिसांना या संदर्भात कळविले जाईल.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलतांना म्हणाले, गरबा व नवरात्र उत्सव आयोजित करणाऱ्या समितीला नियमानुसार गर्भासह इतरही कार्यक्रम आयोजनाचे अधिकार आहे. या कार्यक्रमाला कुणाला तेथे आमंत्रित करावे याबाबतचा अधिकार समितीलाच आहे.

विजय वडेट्टीवार म्हणतात, “समाजात विष पेरण्यासाठी…”

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, दोन धर्म, समाजात आग लावण्याचे काम विश्व हिंदू परिषदेसह सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने होत असते. त्यातून राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रकार देश अस्थिर करण्याचा प्रकार आहे. विविधतेत एकता हे राज्यासह देशाचे वैशिष्ट आहे. परंतु त्याला या पद्धतीच्या मागणीने छेद दिला जात आहे.