अकोला : उच्चशिक्षित तरुण अभिनेत्री केतकी नारायणने आपल्या कसदार अभिनयातून मराठीसह मल्याळम, तेलुगू, हिंदी चित्रपट सृष्टीत छाप सोडली. अकोलेकर केतकीचा नुकताच ‘तू माझा किराना’ मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटातील तिच्या अभिनयाची विशेष चर्चा झाली. मुख्य भूमिकेत समजूतदार व भावनिक पात्राला उत्तम न्याय दिल्याने केतकीच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी केतकीने खास प्रयत्न केले आहेत.

केतकी नारायण मूळची अकोल्याची. तिने आपल्या अभिनयातून दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. मल्याळम, तेलुगू, हिंदी आणि मराठी चित्रपट क्षेत्रात हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून स्थान निर्माण केले. केतकीचे सुरुवातीचे शिक्षण अकोल्यातच झाले. ज्येष्ठ कवी नारायण कुळकर्णी कवठेकर यांची केतकी ही कन्या. वडील कवी आणि मराठी विषयाचे प्राध्यापक असल्याने केतकीला लहापणापासूनच भाषेची आवड होती. कवी संमेलनामध्ये वडिलांना मिळणारी दाद पाहून तिला कलेविषयी खास आकर्षण होते.

उच्च शिक्षण घेतल्यावर केतकीला गलेलठ्ठ पगाराची नोकरी देखील मिळाली. मात्र, मनातील अभिनयाची आवड तिला काही स्वस्थ बसू देत नव्हती. प्रायोगिक नाटकात तिने काम केले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सुद्धा पटकावला. कला क्षेत्रात भरारी घेणाऱ्या कन्येविषयी अभिमान बाळगणाऱ्या वडिलांच्या चेहऱ्याकडे बघून केतकीने अभिनय क्षेत्रातच पुढे जाण्याचा निर्णय घेतला. नामांकित संस्थेत प्रशिक्षण घेऊन केतकीने विविध माध्यमातून अभिनय सुरू केला. लहान-मोठ्या भूमिका साकारतांना केतकीने आपली ओळख प्रस्थापित केली.

‘युथ’ हा तिचा पहिला चित्रपट होता. ‘गर्ल्स’ चित्रपटातील भूमिकेतून केतकीने रसिकांना भुरळ घातली. मल्याळम, तेलुगू, हिंदी व मराठी भाषेतील अनेक चित्रपट, लघूपट, वेबसिरीजमधून ती कायम झळकली. आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहेत.

केतकी नारायणने ‘तु माझा किनारा’ या मराठी चित्रपटात अभिनेत्रीची मुख्य भूमिका साकारल्याने ती चर्चेत आली आहे. नात्यांच्या भावविश्वातून उलगडणारा एक हळवा आणि जिव्हाळ्याच्या प्रवासाची कथा चित्रपटातून मांडण्यात आली. शब्दांपलिकडची भावना आणि कुटुंबातील आपुलकी साकारण्यात आली. या चित्रपटात केतकीने शरयू नावाची व्यक्तिरेखेत जीव ओतला. भूमिकेला न्याय दिला. त्यामुळे केतकीचा अभिनय सिनेरसिकांना चांगलाच भावला.

केतकीकडे कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना स्वतःची आवड, जिद्द, चिकाटी, कौशल्याच्या बळावर चित्रपट सृष्टीत मिळवलेले अढळ स्थान निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. केतकीच्या यशामुळे अकोलेकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.