नागपूर: नागपूरसह राज्यातील विविध भागात नियम धाब्यावर बसवून त्वचारोगाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. चुकीच्या उपचाराने नागरिकांच्या आरोग्यालाच धोका आहे. त्यामुळे त्वचारोग तज्ज्ञांच्या विदर्भ डर्मेटोलॉजिकल सोसायटीकडून महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला (एमएमसी) तक्रार देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. संघटनेकडून याबाबत महत्वाची माहिती एमएमसीकडे देण्यात आली. या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊ या.

विदर्भ डर्मेटोलॉजिकल सोसायटीने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे राज्यभरात अपात्र आणि अपंजीकृत व्यक्तींमार्फत त्वचारोग व सौंदर्यविषयक उपचार वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. या संदर्भात सोसायटीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांची नुकतीच भेट घेऊन तक्रार दिली. शिष्टमंडळात सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. आसरा खुमुशी होते. सोसायटीने सांगितले की, राज्यभरात वैद्यकीय पात्रता नसलेल्या व्यक्तींमार्फत लेझर थेरपी, बोटॉक्स, फिलर्स आणि केमिकल प्रक्रियां सारख्या आक्रामक उपचारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

महाराष्ट्रातील विविध भागात या अपात्र व्यक्तींद्वारे सुरू असलेल्या अनधिकृत उपचारांमुळे संबंधित रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सोसायटीने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला त्वरित अपात्र व्यक्तींवर कठोर कारवाईसह तपासणी मोहिम राज्यभर राबवण्याची विनंती केली. याप्रसंगी डॉ. विंकी रुघवानी यांनी शिष्टमंडळाला सांगितले की, या गंभीर प्रकरणाला गांभिर्याने घेऊन दोषींवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न केले जाईल. परिषदेने नागरिकांना डॉक्टरांची वैद्यकीय नोंदणी तपासता यावी यासाठी आपल्या डॉक्टरांना जाणा ही क्यूआर कोड असलेली मोहिम सुरू केली असल्याचेही सांगितले. त्यातून नागरिकांना डॉक्टरांबाबत अचूक माहिती कळून बोगस डॉक्टरकडे कुमी उपचार घेणार नसल्याचेही सांगितले.

शिष्टमंडळात डॉ. विक्रांत सावजी, डॉ. रिजवान हक, डॉ. अंशुल जैन, डॉ. आशीष पिंपळे, डॉ. धनराज पाटील, डॉ. ईशा अग्रवाल, डॉ. मोहन शेंढ्रे, डॉ. नितीन बरडे, डॉ. रियाज अमीर, डॉ. सौरभ जैस्वाल, डॉ. शुभम चोपडा, डॉ. विनोद तितरमारे, डॉ. विशाल चड्ढा, डॉ. शशांक बन्सोड, डॉ. सुमित जग्यासी आणि डॉ. जेरिल बनाईत यांचा समावेश होता.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद कारवाई करणार काय ?

राज्यात अपात्र व्यक्तींद्वारे त्वचाशी संबधित रुग्णांवर नियमबाह्य उपचाराबाबत त्वचारोग तज्ज्ञांकडून महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, राष्ट्रीय वैद्यकीय परिषद, पोलीसांसह इतरही बऱ्याच संस्था व विभागाकडे तक्रारी केल्या गेल्या. त्यानंतरही दोषींवर ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे या अपात्र व्यक्तींसी कुणा मोठ्या व्यक्तींचे साटं- लोटं आहे काय? हा प्रश्न त्वचारोग तज्ज्ञांच्या संघटनेकडून उपस्थित केला जात आहे.