यवतमाळ : “भाषेविना संस्कृतीचा दिवा विझतो आणि भाषेचा मृत्यू झाला की, देशही मरतो,” असे प्रतिपादन ६९व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी केले.
ते शनिवारी यवतमाळ नजिकच्या जांब गावात आयोजित स्मृतिशेष राजानंद गडपायले साहित्य नगरी येथे आयोजित दोन दिवसीय विदर्भ साहित्य संमेलनात बोलत होते. मंचावर संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. वि.स. जोग, उद्घाटक विद्या प्रकाश मानगावकर, आमदार बाळासाहेब मांगुळकर, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, स्वागताध्यक्ष पांडुरंग खांदवे, वैशाली देशमुख, माजी आमदार संदीप धुर्वे आदी उपस्थित होते.
डॉ. कोलते पुढे म्हणाले, मराठी भाषेची समृद्धी आणि तिच्या जपणुकीचा विचार करण्यासाठी मराठी माणसालाच वेळ नाही, ही दुर्दैवी बाब आहे. इंग्रजी भाषेच्या मोहात आपण आपली ओळख हरवून बसलो आहोत. संत ज्ञानेश्वर, नामदेव, चक्रधरांची पूजा करतो, पण त्यांनी दिलेला भाषेचा विचार विसरून गेलो आहोत, लेखक व्हायचे असेल तर आधी चांगला वाचक व्हा. पुस्तकांवर प्रेम करा, कारण पुस्तक संस्कार घडवते. मातृभाषेचे संस्कार विसरले तर आपली अस्मिता हरवते.
संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. वि.स. जोग यांनी साहित्य हे सामाजिक सलोख्याचे माध्यम असल्याचे सांगितले, तर आमदार मांगुळकर यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा साहित्यातून उमटाव्यात, असे मत व्यक्त केले. वैशाली देशमुख यांनी या संमेलनातून विचारांचे सृजन घडते, असे मत मांडले.
या संमेलनाचे प्रास्ताविक हेमंत कांबळे यांनी, संचालन मंगला माळवे, आणि आभार मनोहर शहारे यांनी मानले. या दोन दिवसीय संमेलनात विविध परिसंवाद, कवी संमेलन, गझल संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलन गावाच्या बाहेर आयोजित करण्यात आल्याने रसिकांची गैरसोय झाली.
मुख्यमंत्री आलेच नाही
या विदर्भ साहित्य संमेलनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र त्यांनी संमेलनास उपस्थिती दर्शवली नाही. त्यांनी पाठविलेल्या संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले. “यवतमाळ ही सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवेची भूमी आहे”, असा संदेश त्यांनी पाठविला. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी “हे संमेलन नव्या विचारांना दिशा देईल आणि सृजन प्रक्रियेला मोलाची चालना मिळवून देईल.” असा संदेश पाठवला.
