ग्रामीण भागातील मतदार प्रचारात अग्रेसर असलेल्या आणि स्थानिक प्रश्नांना भिडणाऱ्या उमेदवाराला मतदान करतो, असा समज आहे. मात्र, हा समज खोडून काढत दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्य़ातील अहेरी आदिवासीबहुल मतदारसंघात कोणताही उमदेवार पसंत नाही अशा ‘नोटा’ पर्यायाचा वापर विदर्भात सर्वाधिक झाला आहे.
विदर्भातील शहरी भागात वाढीव आरक्षणाला विरोध करण्यासाठी ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ आंदोलन उभारण्यात आले. या आंदोलकांनी ‘नोटा’चा वापर करण्याचे आवाहन केले होते. त्याचा परिणाम शहरी भागात जाणवला. मात्र, आदिवासीबहुल, अनुसूचित जाती, ओबीसी मतदार अधिक असलेल्या मतदारसंघातही ‘नोटा’चा वापर मोठय़ा प्रमाणात झाल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्य़ातील अहेरी, आरमोरी येथे नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे नोटांचा वापर झाल्याचे सांगण्यात येते. अहेरीत ५ हजार ७६५ आणि आरमोरी येथे ३ हजार ६५० नोटाला मतदान झाले. मेळघाट, वर्धा आणि अकोला पश्चिममध्ये मोठय़ा प्रमाणात नोटा पर्याय मतदारांनी निवडला.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघासह शहरातील तीन मतदारसंघात तीन हजारांहून अधिक लोकांनी नोटाला मतदान केले. वर्धा आणि अकोला पश्चिम या शहरी मतदारसंघातही नोटाकडे मतदारांचा कल वाढलेला दिसून आला. निडवणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवावा म्हणून नोटाचा पर्याय देण्यात आला आहे. उमेदवारांपैकी कोणीही पसंत नसल्यास हा पर्याय मतदारांना उपलब्ध असतो. नक्षलवादी लोकशाही प्रक्रियेत लोकांनी सहभाग नोंदवू नये म्हणून नोटाला मतदान करण्यासाठी प्रभाव टाकतात, असे दिसून आले आहे.
मोठय़ा प्रमाणात ‘नोटा’ वापर झालेले मतदारसंघ
- अहेरी- ५७६५
- आरमोरी- ३६५०
- पश्चिम नागपूर- ३७१७
- पूर्व नागपूर- ३४६०
- दक्षिण-पश्चिम- ३०६४
- मेळघाट- २८३५
- वर्धा- २७२९
- अकोला पश्चिम- २६१७