चंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करणारे महात्मा गांधी यांची त्याग व बलिदानाची गाथा साता समुद्रपार पोहोचली असून अनेक देशातील महत्त्वकांक्षी लोक गांधी विचार रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, देशातील सत्याधाऱ्यांकडून महात्मा गांधींना बदनाम करून त्यांच्या मारेकऱ्यांना ‘थोर नायक’ ठरवित धर्मांधता व जातीय भेदाचे राजकारण करून अराजकता माजविण्याचे काम सुरू आहे. अशा मनुवादी व जातीयवादी अराजकतेला ठेचून काढायचे असेल तर गांधी विचारधारा मुळापासून रुजविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी येथे महात्मा गांधी जयंती उत्सव समितीद्वारे आयोजित व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्यान कर्ते ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत झटाले, प्राचार्य डॉ. देविदासजी जगनाडे, ॲड. गोविंदराव भेंडारकर, धनराज मुंगले, नगराध्यक्ष रिता उराडे, उपनगराध्यक्ष अशोक रामटेके, ऋषी राऊत, विठ्ठलराव गुड्डेवार, डॉ. नामदेव कोकोडे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. ब्रम्हपुरी शहरातील हुतात्मा स्मारक ते बाजार चौकातील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या पदयात्रेत राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार हेदेखील सहभागी झाले होते.
हेही वाचा – आदिवासी विकास मंत्र्यांची गाडी अडवली, नागपुरात आंदोलकांची मागणी काय पहा..
यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, महात्मा गांधींचे महत्त्व देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात तीळ मात्रही योगदान न देणाऱ्या व इंग्रजांची चाटुगिरी करणाऱ्या फितुरांना काय कळणार ? ना शस्त्र, ना दारूगोळा, ना बळाचा वापर करता आपल्या अहिंसावादी विचारातून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे व त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची पत्नी कस्तुरबा यांनी महिलांसाठी दिलेले योगदान हे इतिहासात अजरामर आहे. मात्र महात्मा गांधींच्या बदनामीचे षडयंत्र सत्ताधाऱ्यांकडून रचल्या जात असले तरी गांधी विचारधारा ही कधीच नष्ट होणारी नाही.
हेही वाचा – बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर; दिव्यांग मंत्रालय विभाग केवळ नावापुरतेच!
देशाला गांधी विचारांची गरज – चंद्रकांत झटाले
अकोला येथील प्रसिद्ध व्याख्यान कर्ते ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत झटाले यांनी ज्या गांधींवर एक लक्ष पाच हजार लेखकांकडून पुस्तकांचे लिखाण झाले व जगातील ७० देशांमध्ये गांधीजींचे पुतळे बांधले अशा महान थोर पुरुषांचा अवमान करण्यासाठी देशातील असमाजिक तत्त्वांकडून थोर महात्म्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधल्या जात आहे. देश अधोगतीच्या मार्गावर आणून पूर्णता उद्ध्वस्त करण्याचा डाव मोडून काढण्यासाठी देशाला पुन्हा गांधी विचारांची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले.