नागपूर : राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटी रुपयांच्या बाजारमूल्याची सरकारी जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार संचालक असलेल्या अमीडीया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीवर हा आरोप असून, वडेट्टीवार यांनी या व्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
वडेट्टीवार नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी थेट फडणवीस सरकारवर लक्ष्य करीत विचारले, “शेतकऱ्यांना फुकट सल्ले देणारे अर्थमंत्री आपल्या मुलाला मात्र फुकट जमीन देणार का? अजित पवारांच्या मुलासाठी फाईल रॉकेटच्या वेगाने फिरली. केवळ काही तासांत आयटी पार्क आणि डेटा सेंटरसाठी जमीन मंजूर झाली, एवढेच नव्हे तर तब्बल २१ कोटींची स्टॅम्प ड्युटी माफही करण्यात आली. हे सर्व कायद्याने योग्य आहे का?”
काँग्रेस नेत्यांच्या मते, ही जमीन महार वतन म्हणून सरकारच्या मालकीची होती. अशा प्रकारच्या सरकारी जमिनींची खरेदी विक्री कशी होऊ शकते, हा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्याची तिजोरी रिकामी आहे असे सांगून शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारली जाते. पण उद्योगपतींना आणि सत्ताधाऱ्यांच्या नातलगांना मात्र कोट्यवधींचे लाभ दिले जातात. हा सरळसरळ महसूल घोटाळा आहे,असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
त्यांनी पुढे म्हटले की, “पुण्यातील अशा व्यवहारातून एक लाख कोटी रुपयांचा महसूल बुडवला गेला आहे. हे घोटाळे थांबवले तर शेतकऱ्यांची कर्जमाफीही शक्य होईल आणि त्यांना हेक्टरी मदत देता येईल.”
वडेट्टीवार यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट सवाल केला — पारदर्शक कारभाराचा दावा करणारे मुख्यमंत्री आता कारवाई करतील का? की सत्ता टिकवण्यासाठी दुर्लक्ष करणार? या घोटाळ्याची सखोल चौकशी करून पुण्यातील जमीन व्यवहार त्वरित रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
