चंद्रपूर : माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे पदमुक्त अध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या बचावासाठी समोर आले आहेत. त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आवाहन देत बाजार समितीच्या निवडणुकीत भंडारासह राज्यात २२ जिल्ह्यांत भाजपा – काँग्रेस युती झाली होती. मग देवतळे यांच्यावरच पदमुक्तीची कारवाई का केली, असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, आता हा वाद दिल्ली दरबारी जाणार आहे.

चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपा युती झाली होती. त्यानंतर निकालाच्या दिवशी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी ढोलताशाच्या निनादत गुलाल उधळीत नृत्य केले होते. हा व्हिडीओ सार्वत्रिक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी देवतळे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून पायउतार केले. यामुळे वडेट्टीवार यांना धक्का बसला. जिल्ह्यात काँग्रेस पक्षात खासदार बाळू धानोरकर व वडेट्टीवार असे दोन गट सक्रिय आहेत. देवतळे यांच्या पदमुक्तीनंतर या दोन्ही गटातील संघर्ष वाढला आहे. वडेट्टीवार यांनी मंगळवारी त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी काँग्रेसच्या निवडक नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला माजी मंत्री आमदार सुनील केदार, प्रदेश काँग्रेस पदाधिकारी रवींद्र दरेकर तथा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा – वाशीम : जिल्ह्यात सर्वाधिक काळ ठाण मांडून बसलेले निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांची अखेर जिल्ह्याबाहेर बदली!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बैठकीत वडेट्टीवार यांनी राज्यात २२ जिल्ह्यांत बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा – काँग्रेस युती झाली असताना कारवाई फक्त चंद्रपूर जिल्ह्यात कशी, असा प्रश्न उपस्थित केला. ही कारवाई एकतर्फी आहे. त्यामुळे आता दिल्ली दरबारी न्याय मागू, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे, वडेट्टीवार यांनी १६ मे रोजी चंद्रपूर येथे एक बैठक आयोजित केली आहे. त्यात जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यात १२ पैकी ७ बाजार समित्यांमध्ये काँग्रेस पक्षाने यश संपादन केले आहे. काँग्रेस मोठा पक्ष आहे. मोठ्या पक्षात असा प्रकार सुरूच असतो. तेव्हा मतभेद बाहेर जाऊ देऊ नका. एकमेकांना सांभाळून घेत काम करा, असा सल्ला यावेळी माजी मंत्री, आमदार सुनील केदार यांनी दिल्याचे कळते. कर्नाटक निवडणूक निकालानंतर राज्यात मोठे फेरबदल होण्याचे संकेतही यावेळी देण्यात आले.