आयएएस होण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उंचीने जरी कमी असलो तरी माझे स्वप्न मोठे आहे. मला आकाशात भरारी घ्यायची आहे. कारण मला आयएएस व्हायचे आहे, अशी जाज्वल्य इच्छाशक्ती बाळगून लोखंडे बंधूनी आर्थिक मदतीच्या अपेक्षेने ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट दिली.

विकास शंकर लोखंडे, वय २४ वर्षे आणि उंची फक्त ३० इंच आहे. सध्या तो कामठी मार्गावरील पीडब्लूएस महाविद्यालयात प्रथम वर्षांला शिकत आहे. त्याचा लहान भाऊ आकाश शंकर लोखंडे याचे वय १८ वर्षांचे असून उंची केवळ २८ इंच आहे. आकाश कामठीच्याच नूतन सरस्वती विद्यालयात नववीत शिकत आहे. त्यांची लहान बहीण मोनिका १६ वर्षांची असून तिची उंची ३० इंच आहे. तिन्ही भावंडांची उंची अनुवंशिकतेच्या कारणास्तव वाढू शकली नाही. त्यांची बौद्धिक वाढ सामान्यांसारखीच आहे. केवळ हाडांची वाढ न झाल्याने ठेंगणेपण दिसून येते. आश्चर्य म्हणजे चार बहीण भावंडे असून मोठय़ा बहिणीची उंची सामान्यपणे वाढली असून ती तिच्या सासरी आहे. मात्र विकास, आकाश आणि मोनिका यांचीच उंची वाढू शकलेली नाही.

उंची अभावी अनेक मर्यादा येतात. शिवाय समाजात मनोरंजनाचा, टिंगल टवाळीचा विषयही होतो, हे वेगळे सांगायला नको. अशावेळी चेष्टा करतात, टर उडवतात. त्याचे काय करायचे. हे तर आम्ही रोजच अनुभवतो, असे विकास सहज म्हणून गेला. काहीही असले तर ‘मला आयएएस व्हायचे’, अशी जबर इच्छा त्याने बोलून दाखवली. पीडब्लूएसमध्ये इतिहास विषयात सध्या तो पदवी करतो आहे. ही तिन्ही भावंडे कामठीला कल्पना सिद्धार्थ श्रावणे या मामा-मामीकडे राहतात. त्यांच्यासोबत मामाची दोन मुलेही राहतात. असे सहाजणांचे कुटुंब मामाच्या हात मजुरीवर उदरनिर्वाह करीत आहे.

ही भावंडे मूळची यवतमाळ जिल्ह्य़ातील पुसदची असून त्यांचे आईवडील पंचशीला शंकर लोखंडे दुसऱ्यांच्या शेतावर शेतमजुरी करतात. शेतात रोजगार नसतो तेव्हा कर्नाटकात जातात. विकास आणि आकाश दोघांनाही मामाकडे शिकण्यासाठी ठेवले आहे. मामाचीही घरची परिस्थिती हलाखीची आहे. लोखंडे बंधूंचा कामठीच्या मोहंमद अली शिक्षण महाविद्यालयातील नातेवाईक विकास दिवेकर ‘लोकसत्ता’ कार्यालयात आले. ते म्हणाले, २०१२मध्ये ‘कलर्स’ चॅनलवरील इंडियाज गॉट टॅलेंट अंतर्गत चांगले यश मिळवले होते. मात्र, त्यात मदत काहीच झाली नाही.

या दोघांचाही शिक्षणाचा खर्च मामांना पेलवत नाही. त्यांच्या शिक्षणाचा खर्च तरी शासनाने द्यावा, अशी मागणी आहे. त्यांच्याकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे. केवळ परीक्षेत पेपर लिहिताना अर्धा तास जास्त मिळतो, या पलीकडे त्या प्रमाणपत्राचा उपयोग नाही. आकाश आणि विकासला शिकण्याची इच्छा आहे. जरी ते शरीराने वाढले नसले तर त्यांची बौद्धिक क्षमता आपल्यासारखीच आहे. त्यामुळे त्यांचा शैक्षणिक खर्च शासनाने उचलावा किंवा समाजाने मदत करावी, असे आवाहन विकास दिवेकर यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikas and akash lokhande want to become ias
First published on: 29-07-2016 at 01:23 IST