नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये होणाऱ्या हाणामारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. एक दिवसापूर्वीच तुरुंगात मारहाणीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा मंगवारी हिंसक घटनेचे गालबोट लागले. येरवाडा कारागृहातून स्थलांतरीत करण्यात आलेल्या कुख्यात गुन्हेगार बंदीवान प्रवीण श्रीनिवास महाजन याने मंगळवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहात हा राडा घालत दुसऱ्या बंदीवानाला मारहाण केली.

पुणे येथील कसबा पेठेतला रहिवासी प्रविण महाजनने पोलिस हवालदाराची हत्या केली होती. त्या प्रकरणात प्रविणला सुरक्षेच्या कारणावरून येरवाडा येथून नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थलांतरीत करण्यात आले आहे. कारागृहातल्या गोल बराक क्रमांक एकमध्ये सकाळी ८ च्या सुमारास त्याने दुसऱ्या बंदिवानाला ही मारहाण केली.

मंगळवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास कैदी नेहमीप्रमाणे नळावर बादलीत पाणी भरत होते. यातील बंदी यशपाल नानकचंद चौहान हा बादलीने पाणी भरत असताना तोसिफ इब्राहिम शेख याने त्याची बादली काढून स्वतःची बादली लावली. त्यामुळे आधी त्यांच्यात वाद  झाला. ते एकमेकांना शिवीगाळी करत होते. वाद वाढला तेव्हा प्रवीण महाजन तिथे पोहोचले आणि तौसिकवर झडप घातली. प्रविणने चौसिफला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकीही दिली.मध्यवर्ती कारागृहातील पोलीस शिपाई अमोल राजू इखारकर यांनी तुरुंग अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठत धंतोली पोलिसांना सुचना दिली.

पोलिस हवालदाराची केली होती हत्या

तुरुंग अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून आरोपी प्रवीण महाजन विरुद्ध धंतोली पोलिस ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूर मध्यवर्ती कारागृहात एका आठवड्यात कैद्यांमध्ये हाणामारीची ही दुसरी घटना आहे. प्रवीण महाजनचा गुन्हेगारी इतिहास मोठा आहे. मे २०२१ मध्ये त्याने पुण्यात पोलिस हवालदाराची हत्या केली. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला येरवडा तुरुंगातून नागपूर तुरुंगात हलवण्यात आले. येथेही तो वारंवार हिंसाचारात सहभागी होत आहे.