बुलढाणा: चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथील सोमनाथ मंदिरात अस्वलाच्या कुटुंबाने स्वच्छंद भटकंती केली. याची चित्रफीत समाज माध्यमावर वेगाने सामायिक होत आहे. पुरातन शैलीचे हे मंदिर जागृत असून तेथील सोमनाथाला केलेला नवस लगेच पावतो, अशी हजारो भाविकांची श्रद्धा आहे.
डोंगरशेवली गाव व मंदिर ज्ञानगंगा अभयारण्याला लागून आहे. यामुळे गाव व मंदिर परिसरात बिबट्या, रोही , अस्वल आदी वन्य प्राण्यांचा मुक्त संचार राहतो. गावाबाहेर असलेल्या या मंदिरात बुधवारी ( दि २८) रात्री ९ वाजेनंतर अस्वल आपल्या तीन पिल्लांसह शिरले. मुख्य द्वारातून आलेल्या या परिवाराने नंदी जवळून थेट मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. भगवान शंकराच्या पिंडीजवळ हे अस्वल कुटुंब आले. त्यांनी तेथील प्रसादाचा आस्वाद घेतला. यानंतर हा परिवार आल्यावाटेने परत फिरला.
हेही वाचा…वाहतूक कोंडीमुळे नागपूरकर हैराण! कस्तूरचंद पार्कजवळील पुलाचे लँडिंग चुकले…
त्यांची ही भटकंती मंदिराच्या ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाली. ही दृश्यफीत सध्या समाज माध्यमावर वेगाने ‘व्हायरल’ होत असून खमंग चर्चेचा विषय ठरली आहे.