नागपूर : मानव-वन्यजीव संघर्ष थांबवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा निर्णय अलीकडेच शासनाने घेतला. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरात २०२३ पासूनच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आभासी भिंतीचा प्रयोग सुरू आहे. ज्या १६ गावांमध्ये हा प्रयोग करण्यात आला त्या गावातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मानवी मृत्युदर कमी झाल्याचे समोर आले आहे.
राज्यातील सर्वाधिक मानव-वन्यजीव संघर्ष चंद्रपूर जिल्ह्यात आहे. त्यावर उपाय म्हणून वनविभागाने २०२३ मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र परिसरातील काही गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आभासी भिंतीचा प्रयोग सुरू केला. या उपक्रमाचे आता चांगले परिणाम दिसून येत आहेत. गेल्या दोन वर्षांत या आभासी भिंतीच्या परिसरात प्रवेश करणाऱ्या वन्यप्राण्यांबाबत आधीच ९,२६७ सतर्कतेच्या सूचना मिळाल्या. यापैकी ४,५८८ वाघाच्या, २,३६७ बिबट्याच्या आणि २,३२२ अस्वलाच्या प्रवेशाच्या सूचना होत्या. वाघ, बिबटे आणि अस्वलांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मानवी वस्त्यांमध्ये प्रवेशाचा प्रयत्न केला. मात्र आभासी भिंतीमुळे आधीच सतर्कतेची सूचना मिळाली आणि वन विभागासह गावकरीही सावध झाले. त्यामुळे संघर्ष टळला. २०१९ ते २०२३ या कालावधीत या व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील १६ गावांमध्ये आठ गावकऱ्यांचे मृत्यू झाले. त्यामुळे याच १६ गावांच्या आणि जंगलाच्या सीमेवर आभासी भिंतीचा प्रयोग करण्याचे ठरले. या प्रयोगानंतर गेल्या दोन वर्षांत केवळ एक मानवी मृत्यूची घटना नोंदवली गेली.
सीताराम पेठमध्ये सर्वाधिक सूचना
सीताराम पेठ, काटवन, पडझरी, भादुर्णा-१, मारोड, रत्नापूर, कुकडहेटी, वासेरा, मोहाबाडी, खटेरा, वायगाव, चक निंबाडा, शिओनी, बेलारगाव, विहीरगाव आणि मदनापूर या बफर गावांमध्ये आभासी भिंतीचा प्रयोग करण्यात आला. गेल्या दोन वर्षांत सीताराम पेठमध्ये सर्वाधिक २,२६९ सतर्कतेच्या सूचना मिळाल्या. यात १,०१८ वाघांच्या, ४३४ बिबट्यांच्या आणि ८१७ अस्वलीच्या सूचना होत्या. भादुर्णा-१ गावात गेल्या काही वर्षांत सर्वाधिक ए १,४५४ वाघांच्या सतर्कतेच्या सूचना मिळाल्या.