नागपूर : छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद उठला होता. विश्व हिंदू परिषदेने या विरोधात मोठे आंदोलन उभारले होते. औरंगजेबाची कबर सरकारने तिथून हटवावी अशी मागणी ही करण्यात आली. यावरून नागपुरात मोठी दंगल घडली होती. मात्र, आता विश्व हिंदू परिषदेने आपली भूमिका बदललेली आहे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक चौगुले यांनी सांगितले की अशा मुद्द्यांवरून राजकारण करू नये. नागपुरात ‘हिंदू पुनरुत्थानाचे शिल्पकार मोरोपंत पिंगळे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानंतर चौगुले पत्रकारांशी बाेलत होते.
मंदिर व्यवस्थापन समितीमध्ये कोण सदस्य राहतील यात राजकीय व्यक्तींनी हस्तक्षेप करू नये. तसेच समितीमध्ये राजकीय सदस्य ठेवायचाच असेल तर तो भाविक असावा आणि हिंदू धर्मातील सर्व परंपरांचे पालन करणारा असावा, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक चौगुले यांनी मांडली.
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील मंदिरांच्या जमिनीवर कथित अतिक्रमण केल्याचा मुद्दा विहिंपने उपस्थित केला आहे. त्यावर चौगुले म्हणाले, राजकीय व्यक्तींनी मंदिर व्यवस्थापन समितीबाबत निर्णय घेऊ नये. भाविकांनीच ती ठरवावी. छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेली औरंगजेबाची कबर आणि तिचा गौरव केला जाऊ नये. ती एक खासगी जागा आहे. ती खासगी राहू द्या, त्याचे राजकारण करू नका, असेही ते म्हणाले. १ आणि २ ऑगस्टला ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या विश्व हिंदू संमेलनात जगभरातील ५०० प्रतिनिधी सहभागी होतील, असेही चौगुले यांनी सांगितले. औरंगजेबाची कबर हटवण्यावरून विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. तसेच मंत्री राज्यातील मंत्री नितेश राणे यांनीही औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र सरकारने यावर सावध भूमिका घेतली होती. यानंतर आता विश्व हिंदू परिषदेने आपली भूमिका बदलवली असून अशा गोष्टींचे राजकारण करणे कोणाचेच भले नाही असे सांगितले.
चौगुले असलेल्या याच कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोरोपंत पिंगळेंची आठवण सांगत पंचहात्तरीबाबत एक विधान केलं. “पंचाहत्तरीची शाल अंगावर आली की निवृत्त व्हायचं असतं” असं मोहन भागवत यांनी पुस्तक प्रकाशनाच्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं. मोरोपंत पिंगळे यांना निवृत्त होण्यास सांगण्यात आलं तेव्हा ते निवृत्त झाले असंही मोहन भागवत म्हणाले. मोहन भागवत यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे. दरम्यान याबाबत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी या वक्तव्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.