गडचिरोली : वन विभागाकडून वारंवार सूचना देऊनही रानटी हत्ती पहायला जंगलात जाणे एकाला चांगलेच महागात पडले. खड्ड्यात पडल्याने त्याच्या पायाचे हाड मोडले. ज्ञानेश्वर शामराव गहाणे (४५, रा. कुंभीटोला, ता. कुरखेडा), असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून रानटी हत्तीच्या कळपाने उच्छाद मांडला आहे. यामुळे शेतीचे व घराचे नुकसानदेखील झाले आहे. हा कळप अत्यंत आक्रमक असल्याने वन विभाग यावर नजर ठेऊन आहे. सध्या हा कळप कुरखेडा तालुक्यातील घाटीच्या जंगलात आल्याने परिसरातील नागरिकांनी जंगलात जाऊ नये, अशी सूचना वारंवार देण्यात येत आहे.

हेही वाचा : राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर; बैठका, चर्चा अन् बरंच काही; ‘असं’ असेल मनसेचं ‘मिशन विदर्भ’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, काही नागरिक कुतूहलापोटी हत्ती पाहायला जंगलात जाण्याचा प्रयत्न करीत आहे. असाच प्रकार घाटी परिसरातील जंगलात घडला. कुंभीटोला गावातील काही नागरिक हत्तींचा कळप आल्याचे कळताच जंगलाच्या दिशेने गेले. मात्र, कळपातील हत्तींनी जोरदार आवाज केल्याने नागरिक पळायला लागले. त्यापैकी ज्ञानेश्वर गहाणे हे धावताना खड्ड्यात पडले, यात त्यांच्या पायाचे हाड मोडले व ते जखमी झाले. सुदैवाने हत्ती त्यांच्या दिशेने धावून आले नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.