नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर आता वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून असेच प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघातील प्रकरण ताजे असतानाच आता नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदार मतदारसंघातही मतचोरीचे प्रकरण समोर आले आहे.
राहुल गांधी यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील दोन प्रकरणे अलिकडे उघडकीस आणले होते. काही मतदारसंघात मतदार वाढवण्यात येतात तर काही ठिकाणी भाजपला नको असलेले मतदारांचे नावे गहाळ केली जातात आणि या प्रकरणाला भारताचे निवडणूक आयोग सहकार्य करत असल्याचा आरोप केला होता.
राजुरा विधानसभा मतदारसंघात सहा हजारांहून अधिक मतदार गहाळ करण्यात आले होते. हिंगणा विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत प्रचंड गोंधळ उघड झाला आहे. बोगस नावे, अवास्तव नोंदी आणि संशयास्पद पत्त्यांमुळे मतदार यादीची विश्वासार्हता धोक्यात आली असून, या प्रकारामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
वानाडोंगरीतील राजीव नगर प्रभाग क्रमांक ५ मधील घर क्रमांक १ व ०१ वर तब्बल २०० पेक्षा अधिक मतदार नोंदले गेले असल्याचे समोर आले आहे. ही बाब केवळ विसंगतच नव्हे, तर निवडणूक यंत्रणेकडून गंभीर दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट करणारी आहे. विशेष म्हणजे, याच भागातील झोपडपट्टीत सत्ताधारी पक्षाच्या संबंधित मेघे कुटुंबातील तब्बल २७ सदस्यांची नावे यादीत आहेत.
ही बाब केवळ एका भागापुरती मर्यादित नसून, बुटीबोरी, वाडी, डिगडोह (देवी), नीलडोह, हिंगणा, गोधनी रेल्वे अशा विविध नगर परिषद व जिल्हा परिषद गटांमध्ये हजारो संशयास्पद नावे आढळून आली आहेत. काही प्रकरणांत नागपूर जिल्ह्याबाहेरील विद्यार्थी देखील त्यांच्या होस्टेलच्या पत्त्यावरून मतदार म्हणून नोंदले गेले आहेत, ही बाब देखील अनेक शंका निर्माण करणारी आहे.
या सर्व प्रकारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये निष्पक्षता टिकेल का, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी “बोगस मतदारांच्या आधारावर निवडणुका लढवल्या गेल्यास सामान्य माणसाला निवडणुकीत उतरायची हिंमत राहणार नाही,” अशी प्रतिक्रिया दिली.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते दिनेश बंग म्हणाले, “देशातील व राज्यातील सत्ताधारी बोगस मतांवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. पण राज्य निवडणूक आयोगाने जर विधानसभेतील कलंक पुसायचा असेल, तर तातडीने चौकशी करून घरोघरी सर्वे मोहीम राबवावी आणि बोगस नावे वगळावीत. अन्यथा या निवडणुकीतही लोकशाहीचा हत्या होईल.” असे बंग यांनी स्पष्ट केले.