भंडारा : दरवर्षीप्रमाणे वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आणि वैनगंगेच्या तीरावर वसलेल्या कारधा गावातील घरांमध्ये वैनगंगेचे पाणी शिरले.वर्षानुवर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या गावाकडे शासन आणि प्रशासनाने पाठ फिरविली आहे. मात्र, आता पाणी डोक्याच्या वर गेले आहे. यापुढे पाण्याच्या पातळीत वाढ झाली तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात राहायला जाऊ, तिथेच स्वयंपाक करू आणि जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तिथेच राहू, असा इशारा गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष भाऊ कातोरे यांच्यासह पूर बाधित नागरिकांनी दिला आहे.
मागील अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कारधा गावाला आज पुन्हा पुराच्या पाण्याने वेढले आहे. त्यामुळे पुराचे पाणी कारधा वासियांच्या घरातच नाही तर डोळ्यात आले आहे. भंडारा तालुक्यातील वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या कारधा गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील ६ वर्षांपासून रखडलेला असून अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. दरवर्षी वैनगंगा नदीला पूर आल्यावर नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरते. यात नागरिकांच्या घरांचे व जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. दि. ८ जुलै रोजी आलेल्या मुसळधार पावसाने वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आणि वैनगंगा नदीचे पुराचे पाणी सखल भागातील नागरिकांच्या घरात शिरले आहे. त्यातले एक गाव म्हणजे कारधा. शासनाला वेळोवेळी निवेदन दिलेले असून अद्याप निवेदनाची दखल घेण्यात आलेली नाही. यापुढे पाणी पातळीत वाढ झाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात राहायला जाऊ. तिथेच स्वयंपाक करू आणि जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तिथेच राहू असा इशारा गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष भाऊ कातोरे यांच्यासह पूर बाधित नागरिकांनी दिला आहे.
भय इथले संपत नाही !
वैनगंगा नदी जिल्ह्यासाठी वरदान ठरत असली तरी आमच्यासाठी ती अभिशाप ठरत आहे. गोसेखुर्द धरण झाल्यापासून आमचे जगणे कठीण झाले आहे. नेहमीच ओलावा असलेल्या घरांच्या भिंती कोणत्या क्षणी कोसळतील याचा नेम नाही, घरात कायम विषारी जीवजंतूंचा वावर असून आजवर अनेक घरे धारातीर्थी झाली. मासेमारीच्या आमच्या मुख्य व्यवसायावर कुऱ्हाड आली. आमच्या टरबुज्याच्या आणि डांगरवाड्या पाण्यात गेल्या त्यामुळे उपासमारीची वेळ आली. त्यात आमच्या जीवावर उठलेले प्रशासन. उद्याची सकाळ आमच्यासाठी उजळणार की नाही ही भिती उशाशी घेऊन आम्ही रोज झोपी जातो, वैनगंगेच्या तीरावर वसलेल्या कारधा गावातील मनिषा आंबेडारे यांची लोकसत्ताशी बोलताना मांडलेली ही मनाला सुन्न करणारी व्यथा.
घरची भिंत पडून चिमुकल्याचा पाय फ्रॅक्चर..
काहीच दिवसांपूर्वी गावातील एक भिंत ओलाव्याने खचली आणि पडली. दुर्दैवाने त्या ठिकाणी खेळत असलेल्या एका चिमुकल्याच्या पायावर भिंत पडल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला.
आठ दिवसांपूर्वी दिले निवेदन…
मागील सहा वर्षापासून नदीचे पाणी आमच्या गावात आणि घरात येते. त्यामुळे दरवर्षी प्रचंड नुकसान होते. मात्र, पाच ते सहा हजार रुपये देऊन शासन आमची बोळवण करते. पूर असल्यानंतरही आणि पूर ओसरल्यानंतरही आमचे जगणे कठीण झाले आहे, याची कल्पना आम्ही शासनाला वारंवार निवेदन व पत्राद्वारे व काही आंदोलन कृतीने कळविले आहे. तरीपण आमच्यावर शासन व प्रशासन लक्ष देत नाहीत. यावर्षी सुद्धा तीच परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनाने आधीच योग्य त्या उपाययोजना कराव्यात. अन्यथा आम्ही प्रकल्पग्रस्त आंदोलनाचा विचार करू, असे निवेदन जिल्हाधिकारी यांना आठ दिवसांपूर्वी देण्यात आले.