यवतमाळ : शुक्रवारी मध्यरात्री सिंदखेड राजा येथे झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात वणी (जि. यवतमाळ) येथील आयुष घाडगे हा प्रसंगावधान राखल्याने बचावला. जणू त्याचे आयुष हे नाव सार्थक ठरले आणि तो आयुष्यमान झाला! एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना आयुषने या अपघाताचा थरार सांगितला.
आयुष नागपूर येथे नोकरी करतो. तो बुटीबोरी येथून विदर्भ ट्रॅव्हल्समध्ये बसला. सर्वात शेवटी ३० नंबरची त्याची सीट होती. त्याचे अन्य तीन मित्र वणी येथून दुसऱ्या खासगी बसने निघाले होते. ते चौघेही पुणे येथे जात होते. आधी चौघेही विदर्भ ट्रॅव्हल्सने सोबतच जाणार होते. मात्र प्लॅन बदलला आणि आयुष नागपूरहून विदर्भ ट्रॅव्हल्सने निघाला. प्रवासादरम्यान तो आपल्या मित्रांच्या संपर्कात होता. त्यामुळे दुसऱ्या बसने निघालेले मित्र मागे असल्याचे त्याला माहीत होते. गाडी जेवण करण्यासाठी कारंजाच्या पुढे थांबली. सिंदखेडराजा येथे पिंपळखुटा येथे रात्री सव्वा वाजताच्या सुमारास गाडी दुभाजकाला धडकली आणि उलटली. अंगावर वरचे लोक पडल्याने तो खडबडून जागा झाला. गाडीत हलकल्लोळ माजला होता. आयुष आणि इतर तिघांनी प्रसंगावधान राखत आपल्या समोरची काच फोडून गाडीतून बाहेर उड्या घेतल्या. त्यानंतर काहीच वेळात डिझेल टॅंकचा स्फोट होऊन ट्रॅव्हल्सने पेट घेतला. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी कोणालाही संधीच मिळाली नाही.
हेही वाचा – समृद्धी अपघात : प्रवासी आनंदाने जेवले अन् बसमध्ये बसले; सर्वकाही सुरळित होतं पण नियतीला…
अन्य प्रवाशांचा होरपळून मृत्यू होताना परिसरात आर्त किंकाळ्या आणि आगीच्या ज्वाळाच होत्या. तो अनुभव भयानक होता. मागाहून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये अन्य तीन मित्र आले. त्यांनी आवाज देऊन आपल्याला शोधले. मी प्रतिसाद दिल्यानंतर मित्रांनाही अश्रू अनावर होऊन त्यांनी घट्ट मिठी मारली. काय करावे काही सुचत नव्हते. पोलिसांना माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मी मित्रांसोबत औरंगाबादकडे दुसऱ्या ट्रॅव्हल्सने रवाना झालो, असे आयुषने सांगितले.