वर्धा : कोणी कितीही महासत्ता असल्याचा दावा करोत, पण असंख्य कुटुंबे झोपडीत राहतात व रेशनकार्ड मिळावे म्हणून धडपडतात, हे सरसकट चित्र आहे. निवडणुकीवेळी आठविल्या जाणारा हा मोठा वर्ग. पण संकटात कोणी मदतीस येण्याची शक्यता नसते. अश्याच एका कुटुंबातील दैन्य आज पावसाने उघडे पाडले. मतिमंद म्हटल्या जाणारा मुलगा व त्याची आई कोसळत्या घरातून वाचली. पण त्यानंतर मदत मिळाली नाही म्हणून संडास, न्हाणीघरात वास्तव्यास असल्याचे करुणादायी चित्र आहे.
मागील दोन दिवसांपासुन जिल्ह्यात पावसाचा दमदार मुक्काम आहे. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी घरांची पडझड झाली. अश्यातच हिंगणघाट तालुक्यातील सावली वाघ येथे घर कोसळल्याने वृद्ध आईसोबत मुलाला घरातील स्नानगृह व शौचालयात राहण्याची वेळ आली आहे. दुपारी चार वाजता दरम्यान घर कोसळले असून तातडीने मदतीची मागणी करण्यात आली आहे. -सावली वाघ येथील श्रीराम डंभारे हे आपल्या वृद्ध आईसोबत येथे राहतात. रोजमजुरी करणाऱ्या श्रीरामची परिस्थिती हलाकीची असल्याने त्याचे घर कच्चे आहे.
दोन दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे घर अचानक कोसळत असल्याचे लक्षात आले. लागलीच श्रीरामने आपल्या आईला बाहेर काढले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. पूर्ण घर पडल्याने श्रीरामला आपल्या आईसोबत घरातील स्नानगृह व शौचालयात राहण्याची वेळ आली आहे. दुपारपासुन घडलेल्या घटनेची अद्याप कोणी दखल घेतली नसून घटनास्थळी कोणी भेट दिली नाही.
प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देत या परिवाराला मदत करण्याची मागणी सावली वाघ येथील नागरिकांनी केली आहे.नागरीक सांगतात की मुलगा सुध्दा मंतीमंदच आहे. तो आपला उदरनिर्वाह मोल मंजूरी करुनच भागवितो.गेल्या अनेक दिवसापासुन घर पडायच्या भितीने जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहे.सरकारच्या घरकुल योजनेतून घराची मागणी केली. पंरतू कागदपत्र पुर्ण नसल्याने घरकुल नाही मिळाले नाही. आता करायचे काय, असा प्रश्न या माय लेकांना पडला आहे.
घर कोसळल्याने वृद्ध आईसोबत मुलाला घरातील स्नानगृह व शौचालयात राहण्याची वेळ आलीhttps://t.co/2jrmCKw8Ui#viralvideo #socialmedia #House #Heavyrain pic.twitter.com/kARlh5oIqE
— LoksattaLive (@LoksattaLive) July 27, 2025
राज्य व केंद्र सरकार पातळीवर गरजू गरिबांसाठी घरकुल योजना राबविल्या जात असतात. असंख्य लोकांनी त्याचा लाभ पण घेतला. मात्र त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. अनेकांना ते शक्य होत नाही. कथित कार्यसम्राट पण अश्या प्रसंगी मार्ग काढण्यास ढुंकून बघत नाही. अश्यावेळी या निराधार कुटुंबासाठी प्रशासनाने मार्ग काढून घरकुल दिले असते तर ही संडासमध्ये राहण्याची वेळ आली नसती, असे गावकरी बोलत आहे. आईस सांभाळणाऱ्या या मुलाचा टाहो कुणी ऐकणार का, असे विचारल्या जाते.