वर्धा : वैद्यकीय मंच व रेडक्रॉस सोसायटी यांच्या विद्यमाने यशोगाथा या उपक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी स्वानुभवाचे बोल यावेळी व्यक्त केले. मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे आयोजक म्हणून उपस्थित होते.
खचाखच भरलेल्या इव्हेंट सभागृहात सर्वप्रथम पोलीस अधीक्षक हसन यांनी आपला जीवनपट मांडला. ते म्हणाले की पिलीभित, रायबरेली, गुडगाव, मुंबई ते वर्धा असा प्रवास आजपर्यंत झाला आहे. मला शेतकऱ्यांविषयी सर्वाधिक आदर आहे. कारण शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी शेतात दहावीपर्यंत राबलो. एका हातात पुस्तक तर दुसऱ्या हातात पाखरांना हाकलणारे गोफन अशी माझी सुरुवात झाली. घरची अत्यंत बेताची स्थिती. नोकरी लागते म्हणून मित्रांच्या सल्ल्याने बी.टेक केले. तात्पुरती नोकरी केली. मोठे अधिकारी व्हायचे हे स्वप्न असल्याने युपीएससी परीक्षेचा मार्ग चोखाळला. दोन वेळा अपयश आल्यानंतर तिसऱ्यावेळी निवड झाली. म्हणून विद्यार्थ्यांनो थांबू नका. स्वत:च्या क्षमता ओळखा. चालत रहा. योग्यता निर्माण करा. परिस्थिती, भाषा, गरिबी याचे निमित्त सांगू नका. यश तुमच्याच पदरात पडेल, असा सल्ला नुरूल हसन यांनी दिला.
जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले की सनदी अधिकारी तयार होण्याचे प्रमाण विदर्भात कमी आहे. इथे स्पर्धा निर्माण झाली पाहिजे. शिक्षक असलेल्या वडिलांचे माझ्या लहानपणीच निधन झाल्यानंतर शेतकरी असलेल्या मामांकडे माझे दहावीपर्यंत खेड्यात शिक्षण झाले. वाचनाची आवड वाढली. थोर पुरुषांच्या चरित्रांचे नियमित वाचन करायचो. बारावीत बऱ्यापैकी गुण मिळाल्यानंतर अभियांत्रिकीत प्रवेश घेतला. कमी गुण असल्याने तिसऱ्या फेरीत इंस्ट्रूमेंटेशन शाखेत प्रवेश मिळाला. मित्र जरा टिवल्याबावल्या करणारेच मिळाले म्हणून पदवीसाठी साडेपाच वर्ष लागले. सनदी अधिकारी व्हायचे ठरविले. तयारी सुरू केली. दिल्लीत विशेष वर्ग लावल्याशिवाय उपाय नाही, असे एकाने सांगितल्यावर तशी तयारी सुरू केली. पण पैश्याची अडचण होती. माझी घालमेल पाहून घरच्यांनी राहते घर विकले. त्याचा नैतिक दबाव शेवटपर्यंत राहिला. दिल्लीत आर्थिक अडचणीतून शहराबाहेर कमी किरायात राहलो. पायपीट केली. परीक्षा देत गेलो. यूपीएससीच्या पाच परीक्षा दिल्या. अपयशच आले. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत उपनिबंधक अधिकारी म्हणून यशस्वी झालो. पत्नी प्रियंकाची तिथेच भेट झाली. एक शेवटचा प्रयत्न म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि यशस्वी झालो. हुलकावणी देणारे यश अखेर पदरी पडले. म्हणून स्वत:च्या योग्यतेचा शोध घ्या. भिती ठेवू नका. अधिकारी होणार म्हणून स्वप्नरंजनात रंगू नका. वाचन वाढवा. लेखनाची सवय असू द्या. आपलं म्हणनं मांडता आलं पाहिजे. वाचन उमेद निर्माण करते. शिवाजींच्या चरित्रातून मला समाजातील सर्व घटकांकडे समानतेने पाहण्याची दृष्टी लाभली. अवांतर उपक्रमात भाग घ्या. मुलाखतीवेळी त्याचा लाभ भेटतो. मी अभियांत्रिकी असो की स्पर्धा परीक्षा असो मी पहिल्या प्रयत्नात कधीच यशस्वी झालो नाही. म्हणून यशाचा पाठलाग करा, असा सल्ला जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिला.
हेही वाचा – ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आता वाघासोबतच ‘जटायू’चेही संवर्धन
डॉ. सचिन पावडे यांनी पण आपल्या खडतर वाटचालीची माहिती दिली. या उपक्रमास महसूल अधिकारी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अर्धांगिनी प्रियंका कर्डिले, नदी वाचवा अभियानाचे भरत महोदय, निसर्गसेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे यांची विशेष उपस्थिती होती. रेडक्रॉसचे डॉ. अरुण पावडे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला.