वर्धा : जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र ते मोठ्या वादंगाचे कारण ठरले. हे महाविद्यालय वर्धा, हिंगणघाट की आर्वीत असे वाद सूरू झाले. वर्धा मुख्यालय म्हणून शासनाने वर्धेलगत सतोडा येथे जागा दाखवून मंजुरी दिली. तोच हिंगणघाट पेटून उठले. अडीचशे दिवस आंदोलन चालले. शेवटी वर्धा नाहीच असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच शासकीय हिंगणघाट येथे तर खासगी तत्वावर आर्वीत वैद्यकीय महाविद्यालय देण्याची घोषणा विधिमंडळात केली. त्यानंतर जागेचा वाद सूरू झाला. तो अजून सुटला नाही. त्यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाद संपवा, असे खडसावून सांगितले. हिंगणघाट येथे जागेचा वाद कायम असतांना इकडे आर्वीत मात्र शांततेने हालचाली सूरू होत्या. शासकीय जागेचा शोध घेण्यात एक व्यक्ती नेटाने प्रयत्न करीत होती. हेही वाचा : ठरलं! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६५ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा ‘येथे’ होणार… ती व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे हे होत. त्यांनी पाठपुरावा करीत जागा शोधली. शेवटी त्या जागेवर आर्वी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने शिक्कामोर्तब केले आहे. ६ ऑगस्ट रोजी निघालेल्या पत्रात मौजा काकडधरा येथील २५ एकर शासकीय जागा सामान्य रुग्णालयासाठी मंजूर झाल्याचे नमूद आहे. वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्याच्या दृष्टीने पडलेले हे पहिले पाऊल समजल्या जाते. आर्वी मतदारसंघात आरोग्य सेवा वृद्धिंगत व्हावी म्हणून प्रयत्न सूरू आहेत. वर्धा, अमरावती व नागपूर या तीन जिल्ह्याचे मध्यबिंदू म्हणून राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव हे येते. जागा मंजूर झाली. आता निधी मिळाला की बांधकाम सूरू होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य निश्चित लाभेल, असा विश्वास सुमित वानखेडे यांनी व्यक्त केला. हेही वाचा : शाळेसमोरील मार्ग, की ‘यममार्ग’? नागपूरच्या अजनी रेल्वे मेन्स शाळेसमोरील वळण विद्यार्थ्यांसाठी धोकादायक… आर्वी येथे जागा मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त होत आहे. मागणी करणाऱ्यात पुढे असलेले डॉ. श्याम भूतडा म्हणतात की जागा मिळणे ही सर्वात मोठी उपलब्धी आहे. कारण या ठिकाणी सामान्य रुग्णालय बांधल्या जाईल. दोन वर्ष ते सक्षमतेने चालल्यानंतर एक अट पूर्ण होणार. वैद्यकीय महाविद्यालय सूरू करण्यासाठी ही अट पूर्ण करणे आवश्यक आहे. तीन जिल्ह्यास सोयीचे हे आरोग्य केंद्र ठरेल. तसेच राष्ट्रीय महामार्गावर असल्याने तज्ज्ञ डॉक्टर मंडळी उपलब्ध होतील, असे डॉ. भूतडा म्हणतात. तर दुसरीकडे हिंगणघाट येथे जागेबाबत बैठकाच सूरू असल्याचे गंभीर चित्र आहे.