वर्धा : पटसंख्या नाही म्हणून राज्यातील अनेक शाळा बंद पडणार असल्याची चर्चा सूरू झाली. त्याचा शिक्षक संघटना विरोध करीत असतांनाच शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी शिक्षकांच्या संमेलनात असे होणार नाहीच, अशी खणखणीत ग्वाही दिली. राज्यातील एकही मराठी शाळा बंद पडू देणार नाही, असे डॉ. भोयर म्हणाले. म्हणजेच शाळेत कितीही विद्यार्थी असू द्या, शिक्षकच शिकवणार, असा त्याचा अर्थ काढला गेला. पण वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या डॉ. भोयर यांना आता शिक्षक नसल्याने सफाई कामगार शिक्षक म्हणून जागा भरल्या जात असल्याचे पाहावे लागत आहे.

झाले असे की, पुलगाव नगर परिषदेच्या शाळेत हा प्रकार दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. परिषदेच्या शहीद भगतसिंह प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक शंकर जाधव यांची बदली पुलगाव नगर परिषदेच्याच राणी लक्ष्मीबाई प्राथमिक शाळेत करण्यात आली. जागा रिक्त झाली. म्हणून जाधव यांच्या जागेवर कोणास नेमायचे याचा पेच निर्माण झाला. तेव्हा पालिका मुख्याधिकारऱ्याने त्या रिक्त जागेवर चक्क सफाई कामगार नियुक्त केला. नगर परिषद अधीनस्थ स्वच्छता विभागातील सफाई कामगार रमेश चंडाले यांची अध्यापनासाठी नियुक्ती करण्यात येत आहे, असा आदेश काढण्यात आला.

हा आदेश चक्रावून टाकणारा ठरत आहे. कारण शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळेत आवश्यक शैक्षणिक पात्रता असणारे नियमित शिक्षक नियुक्त करणे आवश्यक आहे. तसेच ज्या शाळेतून बदली करण्यात आली, त्या शाळेत आवश्यक ती पटसंख्या असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे बदली अयोग्य ठरते.

राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे म्हणतात की, हा प्रकार अनाकलनीय आहे. शिक्षण सेवकाची बदली करीत त्या जागेवर सफाई कामगार अध्यापणासाठी नियुक्त करण्याची बाब अफलातून म्हणावी लागेल. शिक्षकाऐवजी सफाई कामगार किंवा अन्य संवर्गातील नियुक्तीचे कसे समर्थन करणार. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. सफाई कामगार नियुक्ती आदेश त्वरित रद्द करावा. तसेच पात्र शिक्षकांची लगेच नियुक्ती करावी, अशी संघटनेची मागणी असल्याचे विजय कोंबे म्हणतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासन जबाबदारी असणाऱ्या उपजिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन देत लक्ष वेधले आहे. तसेच राज्य शिक्षण आयुक्तांना याबाबत सूचित केले आहे.