वर्धा : जंगलात डरकाळ्या फोडणारा एकटाच वाघ जंगल व परिसर हादरवून सोडतो. त्याची भिती पंचक्रोशीत पोहचते. ईथे तर तब्बल पाच वाघ गावाकुसाजवळ येऊन पोहचलेत. त्यांचे रोज दर्शन होत असल्याचे गावकरी सांगत आहे. अखेर उपाय करा म्हणून गावाकऱ्यांना मोर्चा काढावा लागला आणि आज त्यावर तोडगा निघाला आहे. पुढे काय होते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून वन अधिकारी झुडूपी जंगल पिंजत आहे.
समुद्रपूर तालुक्यातील गिरडलगत खुरसापार येथील शेतशिवारात ५ वाघ संचार करीत असल्याचे गावकरी सांगत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर भितीत जगत आहेत. शेती कशी करायची व घराबाहेर केव्हा पडणार, अशी समस्या. चार दिवसापासून भय इथले संपत नाही, अशी स्थिती. दर दोन दिवसांनी जनावरांचा फडश्या पडत आहे. बैलबंडीवर वाघोबा हल्ला नित्याचा ठरत आहे. वाघाच्या दहशतीने शेती कामे खोलंबल्याने मजूर घरी बसून आहे. करायचे काय, असा जीवन मरणाचा प्रश्न म्हणून गावकऱ्यांनी गिरड वन खात्याच्या कार्यालयावर हल्ला बोल केला.
मोठी गर्दी जमा झाल्याने उपवनसंरक्षक हरविंदर सिंग यांनी वर्धेवरून येत गावाकऱ्यांची भेट घेतली. वाघाचा बंदोबस्त करा. भयमुक्त शेती करू द्या. एकरी ३० लाख रुपये नुकसान भरपाई द्या, अश्या मागण्या झाल्या. उपाय नं झाल्यास आंदोलन करू, असा ईशारा सरपंच राजू नौकरकर, उपसरपंच मंगेश गिरडे, विजय तडस, मोहगावचे सरपंच विलास नवघरे तसेच पदाधिकारी अमोल पर्बत, राहूल गाढवे, अरुण मोटघरे आदिनी यावेळी दिला. यावर हरविंदर सिंग व वनपरीक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांनी गावाकऱ्यांची समजूत काढीत उपाय करण्याची खात्री दिली. गिरड पोलीस बंदोबस्त ठेवून आहेत.
अखेर गावाकऱ्यांचा ईशारा काम करून गेला. रात्री उशीरा एक वाघ पकडण्याची परवानगी मिळाली. त्यासाठी आज सकाळी चंद्रपूरवरून डॉ. खोब्रागडे व त्यांची चमू गिरड येथे पोहचली आहे. सर्व ताफा जंगलातच आहे. नेमके वाघ किती? या प्रश्नावर अधिकारी सांगतात की चारच आहे. वाघीण व तिचे चार शावक एक वर्षांपासून याच परिसरात आहे. ही पिल्लं आता १२ महिन्याची झाली असून त्यांची पण दहशत असल्याचे सांगण्यात आले. आठ महिन्यांपूरवी एका बछड्याचा रस्त्यावरील अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून वाघीण सैरभैर अवस्थेत याच परिसरात मुक्काम ठोकून आहे. पण त्यामुळे गावकरी चांगलेच भयभीत झालेत. आज एक वाघ पकडण्याची परवानगी मिळाली. मात्र पकडेपर्यंत गावकरी श्वास मुठीत घेऊन जगत असल्याचे चित्र आहे.