वर्धा : शहरातील सार्वजनिक मैदानावर पहिला हक्क तो स्थानिक नागरिकांचा. त्यानंतर सभा, मेळावे, नेत्यांचे कार्यक्रम. मात्र आता शहरातील प्रमुख मैदाने विद्रूप झाल्याच्या स्थितीत असून खेळाडूंची खेळ व नागरिकांची भ्रमंती ठप्प पडली आहे. कारण लोकसभा निवडणूक व अन्य कार्यक्रमात या मैदानाचा वापर झाला आणि त्यानंतर ती तशीच गलिच्छ अवस्थेत सोडून देण्यात आली. त्याबद्दल तक्रारी पण झाल्यात. मात्र प्रशासन ढिम्म. अखेर जिल्हा नियोजन समितीत हा प्रश्न आला.

नियोजन भवन येथे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. यावेळी त्यांनी वार्षिक योजना, अनुसूचीत जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेच्या खर्चाचा वार्षिक आढावा घेतला. बैठकीत खासदार अमर काळे तसेच आमदार दादाराव केचे, समीर कुणावार, सुमीत वानखेडे, राजेश बकाने व वरिष्ठ अधिकारी उपस्थीत होते.

यावेळी शहरातील सार्वजनीक मैदानांचा प्रश्न उपस्थीत झाला. शहरातील विविध मैदानावर अनेक कार्यक्रम होत असतात. कार्यक्रमानंतर मैदान स्वच्छ व पुर्वीप्रमाणे होणे आवश्यक आहे. मात्र तसे होत नाही. त्यामुळे खेळाडू व नागरीकांना त्रास होतो. याबाबत असंख्य तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या. मात्र सुधारणा झाली नाही. त्याचीच दखल घेत पालकमंत्र्यांनी मैदाने स्वच्छ करून देण्याचे निर्देश दिले. तसे नं झाल्यास कंत्राटदारांची देयके थांबवा, असेही निर्देश त्यांनी दिले. आता या आदेशाचा अंमल केव्हा हाच प्रश्न आहे. प्रामुख्याने स्वावलंबी मैदानाचा प्रश्न आहे. हे २३ एकरातील विस्तीर्ण मैदान शहरातील निम्म्या नागरिक व खेळाडूंचे हक्काचे मैदान. मात्र सभेवेळी रस्त्यासाठी ट्रकभर डांबर ओतल्या गेले. मैदानाच्या मधोमध हा प्रकार झाल्याने शेकडो हौशी क्रिकेटपटू हिरमुसले. अनेकांची सकाळची भ्रमंती थांबली. तक्रारी झाल्या. अखेर पालकमंत्री डॉ. भोयर यांनी ही बाब वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत खडसावून मांडल्याने त्याबद्दल आनंद व्यक्त होत आहे.

खेळाडू प्रशांत पुरोहित म्हणतात की पालकमंत्र्यानी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. लवकर कायापालट होईल ही अपेक्षा. वर्षभरापासून सर्व त्रस्त आहेत. शिक्षक धनंजय नाखले यांनी लवकर दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वावलंबी मैदान खराब झाल्याने आम्हास दुसरीकडे जावे लागले. माजी नगरसेवक मुन्ना झाडे यांनी बेहाल मैदानाबद्दल चिंता व्यक्त केली. राजकीय सभा झाली की संबंधित लोकांना जबाबदार धरले पाहिजे. काही व्यापारी मेळा घेतात, पैसा कमावतात व घाण करीत निघून जातात. कार्यक्रमास परवानगी देण्यापूर्वी स्वच्छ करून देण्याचे लेखी हमी घेतली पाहिजे. आता लवकर स्वच्छता करावी, अशी सूचना झाडे करतात. कॅप्टन संजय पिल्लेवार यांनी पालकमंत्र्यांनी दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे. त्यांनी याबाबत आढावा पण घ्यावा, असेही सूचित आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बैठकीत आमदार बकाने यांनी साेयाबिनचे वरूण नावाच्या बियाण्याचा मुद्दा मांडला. हे बियाणे गुणवत्तेचे नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यावर चौकशीचे आदेश बैठकीत देण्यात आले. प्राप्त निधितून चांगली कामे करा. लाेकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. त्यांच्या मान्यतेनंतरच निधी खर्च करावा. विभागप्रमुखाने कामाच्या गुणवत्तेची दक्षता घ्यावी. जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावणारी कामे करावी, अश्या सूचना पालकमंत्री डॉ. भोयर यांनी बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी वान्मथी सी. पोलीस अधीक्षक अनुराग जैन व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.