वर्धा : सर्पमित्रांचा सुळसुळाट व त्यामुळे होणारा अव्यापारेषू व्यापार यामुळे पशुप्रेमी अस्वस्थ झाल्याचे दिसून येते. दोन दिवसांपूर्वी आर्वी येथे एका कथित सर्पमित्राने एका व्यापाऱ्याच्या घरी स्वतः पकडून आणलेला साप सोडून दिला. त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. यापूर्वी त्यांना घरातील साप पकडून दिल्याने दोनशे रुपयाचे बक्षीस घरमालकाने दिले होते.

साप पकडून पैसे कमविण्याचा हा फंडा चांगलाच चर्चेत आला आहे. यावर करुणाश्रम या अनाथ पशूचे संगोपन करणाऱ्या संस्थेचे कौस्तुभ गावंडे म्हणाले की, साप निघाला की प्रथम आठवण येते ती सर्पमित्राची. सापांना वाचवीत लोकांची भीती दूर करणारा हा मित्र त्यासोबतच सापाबाबत असलेली अंधश्रद्धा दूर करीत असतो. सर्पमित्र चळवळ सुरू झाली तेव्हा काही तरुणांना साप हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यामुळे हे मित्र सापांना वाचवून त्यास जंगलात सोडण्याचे कार्य मोफत करीत. आता हौशींचा सुळसुळाट झाला आहे. असे मित्र साप दिसल्यास दहा लोकं जमा करतो. मग साप पकडतो. त्याचे प्रदर्शन विविध प्रकारे खेळवीत करतो. बिनविषारी साप असल्यास त्यास इतरांना खेळविण्यास देतो. प्रसिद्धी झाली की स्वतःला सर्पमित्र म्हणवून घेत फिरतो. क्रूर पद्धतीने साप हाताळून तसे फोटो सोशल मीडियावर टाकतो. विषारी सापांचे दात दाखवितो. हा हिरोगिरी किंवा आधुनिक गारुडीपणा म्हणावा लागेल. वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत साप किंवा अन्य कोणत्याही वन्य प्राण्यांसोबत खेळ केल्यास शिक्षेची तरतूद आहे. मात्र शासन स्तरावर यांस अटकाव नाही, अशी खंत गावंडे व्यक्त करतात.

हेही वाचा – डेंग्यू व चिकनगुनिया आजारावर दुर्लक्षित वनस्पतीद्वारे नियंत्रण! या संशोधनामुळे…

हेही वाचा – नागपूर जिल्ह्यात आणखी एक स्फोट, कामगाराचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर विदर्भ सर्पमित्र मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र सुरकार म्हणाले की, असा खेळ करणारे सर्पमित्र सुसाट झाले आहे. या हौशी मित्रांच्या जिवावर पण बेतले. आठ बळी गेलेत असा खेळ करताना. पूर्वी याचे प्रशिक्षण दिल्या जात होते. आता होत नाही. म्हणून एकाचे पाहून दुसरा प्रयोग करीत असतो. हे थांबविण्यासाठी वन खात्याने पुढाकार घेतला पाहिजे. साप पकडण्याचे कौशल्य असणाऱ्या व्यक्तीस प्रमाणपत्र द्यावे. अनैतिक प्रकार करणाऱ्यास दंड करावा. हे प्रकार थांबणे आवश्यक आहे. व्यक्ती व सर्पमित्र बळी पडत असल्याचे सुरकार सांगतात. मात्र एक तेव्हढेच खरं की हौशी सर्पमित्र व त्यांनी चालविलेले खेळ आता वादग्रस्त ठरू लागत असल्याचे चित्र पुढे येत आहे.