वर्धा : देशाचे भविष्य शाळेत घडते, यास सर्वमान्यता. म्हणून शाळा प्रशासन व शिक्षक कोणती दृष्टी ठेवून विद्यार्थ्यास आकार देतात, हे महत्वाचे. प्रत्येक शाळेत नियमित अभ्यासक्रमात प्राथमिक विज्ञान शिकविणारे धडे पण असतात. त्यात गोडी निर्माण करण्याचे काम शिक्षकांचे. तशी दृष्टी ठेवून बाल वैज्ञानिक घडविणाऱ्या शाळांना आताची घडामोड सुखावणारी ठरणार. प्रयत्नाचे चीज झाल्याची भावना शिक्षक व त्यांचे विद्यार्थी घेत आहे.वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे कल्पनेतून हा उपक्रम पुढे आला आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा यांचे मार्फत जिल्ह्यातील इयत्ता ५ वी ते १२ वीच्या तालुकास्तर व जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी व प्रेरणादायी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना रमण सायन्स सेंटर, नागपूर तसेच इस्रो – भारतीय अंतराळ संशोधन संस्था, बंगळूरू व अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन, कुप्पम या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संस्थांना शैक्षणिक क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे आणखी एक विषेश म्हणजे बंगळूरू येथे विद्यार्थ्यांना विमानाने नेण्यात येणार आहे.

सदर उपक्रमासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधक वृत्ती, आत्मविश्वास, जिज्ञासावृत्ती आणि तंत्रज्ञानाकडे आकर्षण निर्माण करणे हा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना थेट संशोधन संस्थांच्या कार्यपद्धतीची ओळख होणार असून, भविष्यातील वैज्ञानिक आणि संशोधक घडविण्याच्या दृष्टीने ही क्षेत्रभेट एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे.

या क्षेत्रभेटीमध्ये तालुकास्तरावरून एकूण २१६ विद्यार्थी व शिक्षकांनी रमण सायन्स सेंटर नागपूर, तर जिल्हास्तरावरून ५३ विद्यार्थी व शिक्षक इस्रो व अगस्त्या फाउंडेशन, कुप्पम येथे भेट देण्याचे नियोजन आहे. सदर क्षेत्रभेटीसाठी विद्यार्थ्यांची निवड ही तालुका व जिल्हा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून गुणानुक्रमे करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शाळांनी असे बाल वैज्ञानिक घडवीत त्यांचे प्रयोग विज्ञान प्रदर्शनीत अव्वल आणण्यात पुढाकार घेतला, त्या शाळांना हा एक अनमोल ठेवा ठरणार आहे.

जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे माहिती देतांना म्हणाले की या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान व तंत्रज्ञानाच्या संधी, संशोधनाची दिशा आणि वैज्ञानिकांचे प्रत्यक्ष अनुभव समजून घेण्यास सक्षम होणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून भावी वैज्ञानिकांची पायाभरणी वर्धा जिल्ह्यातून होईल. या उपक्रमाच्या नियोजनात जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर, जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे .