वर्धा : खेळाडूंची जडणघडन व्हायची असेल तर तसे पोषक वातावरण असणे क्रमप्राप्त ठरते. म्हणजे मैदान, प्रशिक्षक, आहार, क्रीडा साहित्य व अन्य बाबी चांगले खेळाडू घडवू शकतात. तेच हेरून क्रीडा संकुल बांधण्याचा विचार पुढे आला. जिल्हा पातळीवर तर असे संकुल असतात. पण तालुका पातळीवर अभावच दिसून येतो. वर्धा क्रीडा संकुल मान्य होत त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर आज त्याचे लोकार्पण करण्यात आले.

या सोहळ्यास उपस्थित सर्वच पाहुण्यांनी या प्रशस्त संकुलची प्रशंसा केली. हनुमान टेकडी रांगेतील एका टेकडीवर ५ एकर परिसर सपाट करीत हे संकुल साकारले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधव यांनी आपल्या भाषणातून बोलतांना नमूद केले की टेकडीवर गाडी चढत होती तेव्हा आश्चर्यच वाटले. इतक्या उंचावर मैदान कसे, असा प्रश्न पडला. पण आल्यावर इथल्या सोयी व निसर्गरम्य वातावरण पाहून हरखून गेलो. असे संकुल असेल तर किमान महाराष्ट्रातील क्रीडा विश्वास भविष्य असल्याचा अभिमान वाटतो.

युवकांच्या भल्याचा विचार म्हणून निधी खास याच कामासाठी आणण्याची बाब राजकारणी गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. पण तुम्हास लाभलेला पालकमंत्री हा युवकांच्या भविष्याचा व खेळाडूंचा प्रथम विचार करतो, हे कौतुकास्पद. हे संकुल खेळाडूंची खाण ठरेल, अशी अपेक्षा केदार जाधव यांनी व्यक्त केली. या मागे एक कारण पण होते. जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम या अधिकारी होण्यापूर्वी पाचगणी येथे क्रीडा शिक्षक होत्या. त्यांनी आपल्या भाषणातून हे वर्धा तालुका संकुल पाहून पाचगणी येथील टेबल टॉप मैदानाची आठवण झाल्याची पावती दिली होती. आणि इतर पाहुणे म्हणजे राजस्थान रॉयल संघाचे प्रशिक्षक रोमी भिंडर, पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनीही त्याचीच री ओढली.

पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर हे म्हणाले की भविष्यात हा संपूर्ण २५ एकराचा परिसर निसर्ग इको सिस्टीम म्हणून विकसित केल्या जाईल. गत १० वर्षात जेव्हढी विकास कामे झाली, त्याची पावती जनता देते म्हणून अधिक कामे करण्यास प्रोत्साहन मिळते., अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सांस्कृतिक भवन हे मंजूर त्याच जागेवर होणार. खातरजमा नं करता त्याबद्दल चिंता व्यक्त करणे टाळले पाहिजे, असा टोलाही पालकमंत्र्यांनी लगावला. दुसरा जलतरण तलाव पिपरी येथे होवू घातला आहे, असेही डॉ. भोयर म्हणाले. तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष राजू मडावी यांनी या संकुलच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. आयोजक नीलेश किटे यांनी सूत्र सांभाळले. पद्म ठाकरे, मुरलीधर बेलखोडे, गौरव मेघे, प्रदिपसिंह ठाकूर, रामदास देवतळे, किशोर मानकर, डॉ. मदन इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.