वर्धा : शहर, विभाग, राज्य आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप. अशी चौफेर कामगिरी बजावण्याचा मान वर्धेकर कन्येने पटकावला आहे. येथील सेवानिवृत्त प्रा. गुणवंतराव वडतकर यांची कन्या असलेल्या क्षितिजा सुमित वानखेडे यांना जगप्रसिद्ध फोर्ब्स यादीत उच्च स्थान मिळाले आहे. जगातील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची नोंद घेण्यात आली आहे.

एक उत्कृष्ट व्यवसाय संस्थापक व उत्कृष्ट आर्थिक गुन्हे तज्ज्ञ वकील अशा दोन श्रेणीत त्यांना स्थान मिळाले असून असा बहुमान पटकाविणाऱ्या त्या एकमेव ठरल्या आहेत. गुणवत्ता व त्यांचा अनोन्य संबंध राहिला आहे. २००८ साली नागपूर विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून क्षितिजा यांनी बहुमान प्राप्त केला होता. तर पुढे २०२३ मध्ये इंडिया टुडे या प्रख्यात मासिकाने भारतातील पहिल्या आठ उदयोन्मुख महिला म्हणून सन्मानित केले होते.

हेही वाचा – परीक्षेसाठी केवळ मुंबईत केंद्र; ‘एमपीएससी’चा भोंगळपणा, उमेदवारांची तीव्र नाराजी

आज त्या आर्थिक गुन्हे क्षेत्रातील आघाडीच्या वकिलांपैकी एक असून एका प्रसिद्ध लॉ फर्मच्या संस्थापक आहेत. फोर्ब्सच्या यादीत दोन श्रेणीत प्रथमच एका महिला वकिलास असे मानांकन मिळाले आहे. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की १५ वर्षांपूर्वी मी गुणवत्ता व पदकांनी भरलेली ब्रिफकेस घेऊन मुंबईत आले. मला त्यावेळी कसलाच कुणाचा आधार नव्हता. मात्र कायदा उद्योगात स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याचा मी चंग बांधला होता.

अथक परिश्रम कामी आले. देशातील सर्वोच्च कायदा कंपनीत उच्च पदावर पोहोचल्यानंतर स्वतःची संस्था उभी करण्याचा निर्णय घेतला. लहान शहरातील होतकरू वकिलांना संधी देण्याचे ठरविले. महिला व वंचित घटकास त्याचे सामाजिक हक्क मिळवून देण्याचे धोरण आहे. असंख्य अशी प्रकरणे यशस्वी केलीत. महिला व मानवी हक्क हा आमच्या संस्थेचा आवडीचा प्रांत आहे. आमच्या संस्थेत जेव्हा एखादा नवीन वकील येतो तेव्हा ते कर्मचारी नव्हेत तर एक उद्योजक असल्याची त्याच्यात जाणीव निर्माण करुन दिल्या जाते.

ही भूमिका घेऊन काम करीत असल्याने नामांकित विधी संस्थामध्ये, राष्ट्रीय कार्यशाळा या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी मला संधी मिळते. अशिलाने सादर केलेल्या माहितीचा कागदोपत्री पुरावा तसेच साक्षीदारांचा तपशील ज्युरी मंडळी आवर्जून तपासतात. म्हणून या प्रक्रियेत आम्ही सादर करणार असलेली प्रत्येक बाब प्रामाणिक असावी, याकडे कटाक्ष दिल्या जातो, असे क्षितिजा सांगतात. मला प्राप्त बहुमान हा कष्टाचे चीज झाल्याचे समाधान देणारा ठरला असल्याचे त्या म्हणतात.

हेही वाचा – मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर अवमानाचा खटला; सहा आठवड्यांत जबाब नोंदवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

अव्वल लॉ फर्म्सच्या स्पर्धात्मक जगात या बहुमानासाठी केवळ २५ व्यवस्थापक निवडल्या जात असतात. अ‍ॅड. क्षितिजा यांना दोन गटात बहुमान प्राप्त झाल्याने त्या एकमेव ठरल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सात वर्षांच्या मुलाची आई असणाऱ्या क्षितिजा घटनात्मक कायदा व मानवधिकार या विषयात पीएचडी प्राप्त आहेत. हा बहुमान सर्व महिला वकिलांना प्रेरणा देणारा ठरावा, अशी भावना त्या व्यक्त करतात. सप्टेंबर महिन्यात दिल्लीत आयोजित एका सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या हस्ते त्यांना सन्मानित केल्या जाणार आहे.