वर्धा : राज्याचे सांस्कृतीक मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर आमदार प्रवीण दरेकर, राजे संग्रामसिंह भोसले व अन्य बडी मंडळी. निमित्त बैल पोळ्याचे. शेकडो शेतकरी उपस्थित. त्यांच्या साक्षीने वर्धेकरांसाठी पोळ्याची पोळी आनंद देऊन गेली. मात्र मेट्रो शहरातून आलेल्या या पाहुण्यांनी आपला मुद्दा मांडलाच. मंत्री शेलार म्हणाले, पर्यावरण आणि प्राणी यांचा आदर ठेवण्याचे काम भारतात केले जाते. राज्य शासन संस्कृती, परंपरेला महत्व देऊन काम करत आहे. शेतकऱ्यांच्यादृष्टीने बैल पोळा या उत्सवाला अतिशय महत्व आहे. शहरी नक्षलवाद संपविण्यासाठी पोळ्यासारखे पारंपारिक सण उत्साहात साजरे होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ॲड. शेलार यांनी केले.

रामनगर येथील शहीद भगतसिंग मैदानावर रामनगर पोळा उत्सव समितीच्यावतीने भव्य बैल पोळा उत्सव व कृषि प्रदर्शनी तसेच सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने उत्सव कृषि संस्कृतीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. राज्याच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी राज्य शासन संत ज्ञानेश्वरांचा ७५० वा जयंती उत्सव सोहळा साजरा करीत असतांना त्यांचे साहित्य व वाणी जपण्याचे कार्य करत आहे. राजे भोसले यांनी युध्दामध्ये वापलेल्या तलवारीचा लंडनमध्ये लिलाव करण्यात येत असतांना महाराष्ट्र शासनाने या तलवारीच्या लिलावात अधिक बोली लावून तलवार खरेदी केली. ही तलवार राज्यात आणण्यात आली असून लवकरच विदर्भात आणण्यात येणार असल्यचे पुढे बोलतांना ॲङ आशिष शेलार म्हणाले.
वर्धा जिल्ह्यातील परंपरा जपणे आवश्यक. म्हणून सांस्कतिक भवन तयार करण्यासाठी 25 कोटी मंजूर करण्यात येत असल्याचे सांगून महाराष्ट्राचे शास्त्रज्ञ स्व.जयंत नारळीकर यांच्या नावाने लवकरच वर्धा येथे विज्ञान संग्रहालय उभारण्यात येइल, असे आश्वासन ॲड आशिष शेलार यांनी दिले. एकत्र येणे एकत्र राहणे व संस्कृतीचे जतन करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. याच तत्वावर राज्य शासन काम करते, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री डॉ. भोयर यांनी जिल्ह्यात मंजूर असलेल्या सांस्कृतिक भवनाला निधी मंजुर करण्याची मागणी केली.जिल्ह्यातील डबघाईस आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅकेला राज्य शासनाची बरीच मदत प्राप्त झाली आहे. राज्य मध्यवर्ती बँकेच्यावतीने बँकेला सहकार्य करण्याची विनंती डॉ. भोयर यांनी आमदार तथा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांना यावेळी केली. लंडनच्या सायन्स म्युझियम सारखे विज्ञान संग्रहालय देण्याची पण त्यांनी मागणी केली. ती पण शेलार यांनी मंजूर केली.

राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले की

राज्याची परंपरा, उत्सव, संस्कृती जपण्याचे काम राज्य शासन करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील १२ गडकिल्यांचा जागतिक वारसा म्हणून घोषित करण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. आजच्या शेतीउपयोगी ट्रॅक्टरच्या युगात आजही शेतीसाठी बैलाचे महत्व जास्त आहे. शेतकऱ्यांचे बैलजोडीसोबतचे नाते पिढ्यांपिढ्याचे आहे. राज्यामध्ये ५० हजार किमीचे पांदन रस्ते करण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटून त्यांना शेती माल गावापर्यंत आणण्यास सोईचे होईल, असे ॲङ आशिष जयस्वाल म्हणाले.

राज्याची संस्कृती परंपरा जपण्यासोबतच मराठ्यांचा इतिहास पराक्रम जपण्यासाठी राज्य शासनाने राजे भोसले यांनी युध्दात वापरलेली तलवार लंडन येथून आणली असल्याचे आमदार प्रविण दरेकर म्हणाले. यावेळी श्रीमंत राजे संग्रामसिंह भोसले यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बैल पोळा उत्सवाचे आकर्षण असलेल्या पंढरपूर पुणे येथील बैलजोडीचे पुजन केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर नागरिक, शेतकरी आपल्या बैलजोड्या घेऊन उपस्थित होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी वान्मथी सी. पोलीस अधीक्षक अनुराग जैन, माजी पालिका उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते, आयोजन समितीचे नरेश गुजर व्यासपीठावर उपस्थित होते.