चंद्रपूर : वरोरा येथील बीएस इस्पात स्टील कंपनी आणि अधिकाऱ्यांविरुद्ध १२५.९५ कोटींच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भवानी प्रसाद मिश्रा, आशीष पंडित, आदित्य मल्होत्रा आणि सीएफओ सागर कासनगोट्टुवार यांचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. जिल्ह्याच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे.
अर्माको इन्फ्रालिंक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक शेखर लोहिया यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. २००३ पासून आपण या कंपनीत संचालक आहोत. यापूर्वी माझी पत्नी शीतल लोहिया संचालक होत्या. मार्च २०२१ मध्ये मी आणि आशीष जैन यांनी वरोरा प्लांटमध्ये बीएस स्टील कंपनीच्या व्यवस्थापकी संचालक मिश्रा यांची भेट घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी येथील मुकुटबनमधील मार्की मांगली कोळसा खाण भाडेपट्ट्यावर मिळाल्याने त्यांनी सांगितले. कोळशाच्या कमतरतेमुळे सरकारने ५० टक्के कोळसा खुल्या बाजारात विकण्याची परवानगी दिली आहे. आमच्या कंपनीत गुंतवणूक करा, आम्ही तुम्हाला कोळसा देऊ, असे मिश्रा यांनी सांगितले. त्यानुसार कंपनीला एक कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यानंतर कोळसा पुरवठाही झाला.
यानंतर मिश्रा यांनी, ‘सीएमडीपीए’सोबत करार झाला आहे आणि माझ्या कंपनीला वरोराच्या माझरा, चिनोरा खाणीचे अधिकार मिळाले आहेत, असे सांगितले. १६ सप्टेंबर २०२२ रोजी ‘डीओ’देखील देण्यात आला. ६ सप्टेंबर २३ पर्यंत ६० हजार मेट्रिक टन कोळसा पुरवण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आम्ही बीएस स्टील कंपनीच्या खात्यात ५४ कोटी रुपये जमा केले. परंतु कंपनीने कोळसा दिला नाही. कारण कंपनीने नियमांचे पालन न केल्यामुळे ‘सीएमडीपीए’ने नोव्हेंबर २०२२ मध्येच करार रद्द केला होता. आम्ही बीएस स्टीलला एकूण ७२.५३ कोटी रुपये दिले होते. त्यापैकी ३५.९३ कोटी रुपयांचा कोळसा मिळाला. जून २०२४ पासून कोळशाचा पुरवठा पूर्णत: ठप्प आहे. थकबाकीच्या रकमेची वारंवार मागणी करूनही पैसे परत मिळालेले नाहीत, असे लोहिया यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
याचबरोबर आर्माको इन्फ्रा लिंक्स प्रा.लि.चे बीएस इस्पात कंपनीवर ३६ कोटी, नागपूर येथील विनायक ट्रेडिंग कॉर्पोरेशनवर ५१ कोटी, पुणे येथील एलबी कुंजीरवर २० कोटी, ‘पैसा लागाओ डॉट कॉम’वर १५ कोटी आणि चंद्रपूर येथील आर्माको लॉजिस्टिक्स प्रा.लि.ने बीएस इस्पात यांच्यावर २ कोटी ५६ लाख, असा एकूण १२५.९५ कोटी रुपयांचा फसवणुकीचा आरोप आहे.