अकोला : वाशीम जिल्ह्याला मौसमीपूर्व मुसळधार पावसाने गुरुवारी सायंकाळी झोडपून काढले. काबाडकष्ट करून पिकवलेला शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला होता. तो शेतमाल पावसाच्या पाण्यात अक्षरश: वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.त्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आले असून ते हताश व हतबल झाले. बाजार समितीच्या नियोजनशुन्य कारभारावर तीव्र रोष व्यक्त केला. वाशीम जिल्ह्यात १९ मेपर्यंत ‘येलो अलर्ट’ जाहीर केला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यात गेल्या दीड महिन्यापासून तापमानामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण झाले. विदर्भातील बहुतांश शहरांमधील तापमानाचा पारा चांगलाच चढला होता. अनेक जिल्ह्यातील तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा देखील ओलांडला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात अंशत: घट झाली.

ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाने देखील हजेरी लावली आहे. वाशीम जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. दरम्यान, जिल्ह्यातील विविध भागात आज दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा सुटला. सायंकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील विविध भागात हा पाऊस कोसळला. पावसामुळे जिल्ह्याच्या विविध भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला. मोसमीपूर्व पावसाचा शेतकऱ्यांना जबर फटका बसला. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला होता. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. तुरीसह विविध प्रकारचा संपूर्ण शेतमाल भिजला. पाण्याच्या प्रवाहासोबत शेतमाल वाहून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

विदारक दृश्य

विविध संकटांना तोंड देत घाम गाळून पिकवलेला शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणला. बाजार समितीच्या परिसरात पावसाच्या पाण्यात तो वाहून गेला. वाहून जात असलेला शेतमाल गोळा करण्याचा केविलवाणा प्रयत्न बोरव्हा येथील शेतकरी गौरव पवार करतांनाचे विदारक दृश्य दिसून आले.

हवामान खात्याचा इशारा

वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह (वेग ४०-५० किमी/तास) हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका व अधिकृत स्त्रोतांवरूनच माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले.