यवतमाळ: दिग्रस शहरात आणि तालुक्यात यावर्षी तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. टंचाईच्या झळा ऊन वाढत आहे तसतशा अधिक तीव्र होत आहे.

एप्रिल महिन्यातच तहानेने गावं, वाड्या, वस्त्या व्याकुळ झाल्या आहेत. ही तहान भागवण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले असताना गावातील दानशूर, कर्तव्यनिष्ठ माणसांनी आपल्या शेतातील विहिरी गावासाठी खुल्या करून नागरिकांची तहान भागवत आहे. प्रचंड उन्हातही मानवतेचा हा ओलावा सुखद धक्का देणारा आहे.

दिग्रस तालुक्यातील डेहणी हे गाव सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करीत आहे. उशाला असलेलं धरण, गावात असणारी कोट्यावधींची पाणी पुरवठा योजना, तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत आपली तहान भागवू शकत नसल्याचा तीव्र संताप गावकरी व्यक्त करत आहेत. येथील पाणी पुरवठा योजनेवर तब्बल सव्वा कोटी रुपयांचा निधी खर्ची पडला मात्र योजनेतून सव्वा लिटर पाणीही गावाला मिळाले नाही.

गावकऱ्यांच्या हा संताप, राग आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन येथील सेवानिवृत्त शिक्षक दिवाकर इहरे यांनी गावालगत असलेल्या आपल्या शेतातील विहीर लोकांसाठी २४ तास खुली करून दिली आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित साडेतीन एकर शेती आहे. आपली विहीर अधिग्रहित न करता, पाण्याचा कोणताही मोबदला नको अशी मानवीय भूमिका घेत त्यांनी लोकांना पाणी उपलब्ध करून दिले.

विहिरीसोबतच स्वतःचा मोटार पंप, पाईप आणि वीज उपलब्ध करून दिली आहे. हे करताना त्यांना यावर्षी शेतातील उन्हाळी पिकांना गुंडाळून ठेवावे लागले. दरवर्षी ते शेतात उन्हाळी भुईमूग घेतात. यावर्षी भेंडी, बरबटी, वांगी ही पिके घेणार होते. मात्र गावातील भीषण पाणीटंचाई पाहून नागरिकांची तहान भागविण्यासाठी त्यांनी उन्हाळी पीक न घेता शेतातील विहिरीचे पाणी ग्रामपंचायतीच्या विहिरीत सोडले.

गरजेच्या वेळी चार घोट पाणी विनासायास लोकांच्या कामी पडलं यापेक्षा मोठा मोबदला तो काय असणार? असा प्रश्न ते करतात. गावच्या सरपंच सपना राठोड, सामाजिक कार्यकर्ते बबलू राठोड, ग्राम विकास अधिकारी गुलाब चतुर आणि गावकऱ्यांनी शेतातील विहिरीचे पाणी गावासाठी देण्याची विनंती केली. त्यामुळे गावकऱ्यांना विनामोबदला पाणी देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीही पाणीटंचाईसाठी विहीर उपलब्ध करून दिली होती. आपल्या या भूमिकेमागे गावाबद्दल मानवतेची, माणुसकीची आणि आपुलकीची किनार असल्याचे इहरे यांनी सांगितले.

सेवानिवृत्तीनंतरही सेवा देणारे शिक्षक!

दिवाकर इहरे यांनी दिग्रस विभागीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या हरसूल, कलगाव आणि तुपटाकळी शाळेत ३२ वर्षे सेवा दिली आहे. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ते आजही ओळखले जातात. इंग्रजी विषयाचा दांडगा अभ्यास, मुलांना समजेल अशा पद्धतीने अध्यापन, गरीब विद्यार्थ्यांना सहकार्य करणे, अतिरिक्त वर्ग घेऊन मुलांच्या इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करून घेणे असे अनेक उपक्रम ते राबवत असत. ते डिसेंबर २०१८ मध्ये सेवानिवृत्त झाले. मात्र मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी मार्च २०१९ पर्यंत तब्बल तीन महिने दररोज नियमित शिक्षकाप्रमाणे शैक्षणिक कार्य करून सेवानिवृत्तीनंतरही सेवा दिली.