चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पक्ष हा प्रथम आहे. त्यामुळे पक्षाने निवडणूक लढण्याचा आदेश दिला तर निवडणुकीच्या आखाड्यात अन्यथा निवडणुकीच्या रिंगणाबाहेर, अशी प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रवींद्र टोंगे यांचे उपोषण आंदोलन सोडविण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपोषण मंडपात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपा नेतृत्वाने राज्यातील काही मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. हेही वाचा - जिजाऊंच्या जिल्ह्यात उमेदवारीत महिला दुर्लक्षित हेही वाचा - “सर्वप्रथम तुम्ही रुग्णालयात जा,” उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा रवींद्र टोंगे यांना प्रेमाचा सल्ला, म्हणाले… चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री मुनगंटीवार यांचे नाव आघाडीवर आहे असे विचारले असता, आता पक्षाकडून अद्याप असा कोणताही निरोप आलेला नाही. पक्षात नेतृत्व ठरवेल तो निर्णय अंतिम असतो. मध्य प्रदेशात तीन केंद्रीय मंत्र्यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिली आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्र्यांना उमेदवारी दिली नाही. भाजपामध्ये पक्ष नेतृत्व अंतिम निर्णय घेत असतात. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचा निर्णय झाला असेल तर पक्ष तसे सांगेल. उमेदवारी न देण्याचा निर्णय झाला असेल तर पक्ष तसेही सांगेल. आम्हा कार्यकर्त्यांना पक्ष नेतृत्व जो आदेश देतो, त्या आदेशाचे आम्ही पालन करतो. मात्र आपल्याला अशा कुठल्याही सूचना नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.