लोकसत्ता टीम

नागपूर : पोलीस आयुक्तांकडून शहरात मोठा गाजावाजा करून ‘ड्रग्स फ्री नागपूर सीटी’ अभियान राबविण्यात आले. अनेक महाविद्यालयात ड्रग्स मुक्तीसाठी मोठमोठे फलक लावून कार्यक्रम घेण्यात आले. आता शहरात ड्रग्स तस्करांचे धाबे दणाणून खरोखरच ड्रग्सची तस्करी आणि विक्री थांबेल, असा विश्वासही नागपूरकरांमध्ये निर्माण झाला. मात्र, प्रसिद्धी आणि गाजावाजा आटोपताच ड्रग्स तस्करांच्या टोळ्या नागपुरात पुन्हा सक्रिय झाल्या आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांच्याच आशीर्वादाने ड्रग्स विक्री करून तरुण पिढीला नशेच्या दरीत ढकलत आहेत. पोलिसांनी नुकतीच ११ लाखांच्या ड्रग्ससह एका तस्कराला आटक केली. त्यामुळे ‘आयुक्त साहेब…ड्रग्स तस्करांची साखळी कधी तुटेल? असा प्रश्न नागपूरकर विचारत आहेत.

शहरात पानठेला आणि अनेक चौकातील छोट्या दुकानावर गांजा मिळायला लागला आहे. गिट्टीखदान, वाडी, हिंगणा, अजनी, सोनेगाव आणि अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रग्स तस्करांच्या बैठका होऊन शहरभर गांजा पुरविल्या जात आहे. गुन्हेगारीप्रवृत्तीचा एक युवक सहज जुगाराकडे वळला. जुगार खेळता खेळता तो अमली पदार्थ विक्रेत्यांच्या संपर्कात आला. झटपट पैसे कमविण्यासाठी ड्रग्सची विक्री करू लागला. कमी वेळात जास्त पैसे मिळत असल्याने तो जोमाने कामाला लागला. पोलीस पथक त्याच्या पाळतीवर होतेच. मुद्देमालाची ‘डिलिव्हरी’ देण्यासाठी निघताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून अकरा लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. सूरज गजभिये (३४) रा. गोपाळकृष्णनगर असे अटकेतील विक्रेत्याचे नाव आहे. मात्र, मुख्य आरोपी पंकज साठवणे अजून पोलिसांना सापडलेला नाही.

आणखी वाचा-महायुतीमध्ये बाळापूरवरून ओढाताण

कुख्यात गुन्हेगार ड्रग्स तस्करीत

पंकज हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर चोरी, घरफोडी, जबरी चोरी असे विविध गुन्हे आहेत. तो अमली पदार्थ विक्री करतो. महानगरातून आणलेले एमडी पावडर शहरातील ग्राहकांना देण्यासाठी त्याने सूरजकडे जबाबदारी दिली. पंकजने त्याला पैशांचे आमिष दाखवून अमली पदार्थ विक्रीसाठी लावले. पंकजने त्याच्याकडे ११ लाखांचे एमडी पावडर विक्रीसाठी दिले होते. दरम्यान गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या नेतृत्वातील पथकाने नंदनवन परिसरात जाळे तयार केले. खबऱ्यांनाही कामाला लावले. खात्रीलायक माहिती असली तरी त्याला रंगेहात पकडण्यासाठी पथक तैनात होते. ही कारवाई पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, नितीन रोहित काळे, सुभाष गजभिये यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पब आणि हुक्का पार्लरमध्ये ‘माल’

ड्रग्सचे सेवन महाविद्यालयीन तरुणी-तरुण सर्वाधिक करतात. पब आणि हुक्का पार्लरमध्ये मध्यरात्रीनंतर तरुण आणि तरुणी ‘माल’ म्हणजेच ड्रग्सची मागणी करतात. अनेकदा पबचे संचालकच ड्रग्स तस्कारांसाठी वेगळी व्यवस्था करतात. अमली पदार्थाची विक्री रात्रीच होते. सूरज हा अशाच ठिकाणी जाऊन ड्रग्सची विक्री करीत होता. त्याच्याकडे ११ लाख रुपयांचे ड्रग्स सापडले. आतापर्यंत त्याने अनेक विद्यार्थिनींना ड्रग्सची सवय लावली आहे. मुख्य आरोपी पंकजला पकडल्यानंतर तो अमली पदार्थ कुठून आणतो, याविषयी माहिती मिळेल. नंतरच ही साखळी तोडला येईल.