लोकसत्ता टीम

नागपूर: नाही, नाही म्हणता अखेर काँग्रेसचे पश्चिम नागपुरातील आमदार विकास ठाकरे नागपूर लोकसभा निवडणूक लढण्यास तयार झाले. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणे तेवढे शिल्लक आहे. मात्र सध्या चर्चा आहे, ती ठाकरे यांच्या निर्णयात झालेल्या बदलाची. कालपर्यंत लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसलेले ठाकरे एकदम तयार कसे झाले याची. यामागे विरोधकांची अदृश्य शक्ती तर नाही ना? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान खासदार व नितीन गडकरी हे तिसऱ्यांदा निवडणूक लढणार हे निश्चित होतेच. पण प्रश्न होता तो त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून कोण उमेदवार राहणार याचा. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व स्थानिक काँग्रेस जणांनी उमेदवारांच्या नावाचा शोध घेतला असता त्यांची गाडी थांबली ती विद्यमान आमदार व काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि विधान परिषचे सदस्य आमदार अभिजित वंजारी या दोन नावांपुढे. विकास ठाकरे यांनी मी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नाही, पक्षाचा शहर अध्यक्ष असल्याने सहाही विधानसभा मतदारसंघात पक्षाची प्रचारधुरा सांभाळण्याचे व नियोजनाचे काम आपल्याकडे असल्याने निवडणुकीसाठी वेळ देतायेणार नाही, असे पक्षाकडे नकार कळवला होता. वंजारी यांनीही ते इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले होते. अशा स्थितीत उमेदवारी कोणाला द्यावी, असा प्रश्न काँग्रेसपुढे होता. पक्षातील आणखी एक नेते प्रफुल्ल गुडधे यांचे नाव होते. त्यांनी पक्षाकडे अर्जही केला होता. ठाकरे- वंजारी यांच्या नकारानंतर गुडधे यांच्या नावावर विचार होईल,असे वाटत असतानाच अचानक नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी बैठक घेऊन त्यात विकास ठाकरे यांच्या नावावर सहमती दर्शवली.

आणखी वाचा- “बसमध्ये जागा मिळाली नाही की बसमागे दगड मारत धावणारे असतात…”, देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकरे यांनीही वरिष्ठांनी ठरवले व पक्षश्रेष्ठींनी सांगितले तर पक्षाचा आदेश म्हणून ही निवडणूक लढवेल, असे सांगितले. कालपर्यंत निवडणूक लढणार नाही, असे म्हणणाऱ्या ठाकरे यांच्या निर्णात क्षणार्धात झालेला बदलही काँग्रेसमधील अनेक नेत्यांना धक्का देऊन गेला.त्यामुळेच ठाकरे हे खऱच पक्षाचा आदेश म्हणून निवडणूक लढण्यास तयार झाले की त्यांच्यामागे कुठली तरी अदृश्य शक्ती किंवा बळ उभे करण्यात आले. यामागे विरोधक (काँग्रेसमधील अंतर्गत विरोधक नव्हे) तर नाही ना ? अशी शंका घेणारी चर्चा आता सुरू झाली आहे