लोकसत्ता टीम
वर्धा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या शैलीत विरोधकांना चिमटे घेण्यात वाकबगार आहेत. मात्र, यावेळी त्यांनी पक्षातील नाराज, असुंतष्ट नेत्यांना टोला हाणला. नाराजांची चिंता पक्ष करीत नसल्याचे व ते त्याच पद्धतीने वागणार असल्याचे त्यांना म्हणायचे होते. रामदास तडस यांना उमेदवारी भेटली अन काहींनी नाराजीचे सूर आळविले. त्याचा समाचार घेण्यासाठी ते जिल्हा भाजप तर्फे आयोजित बैठकीत हजर झाले होते. म्हणाले की नाराज नेत्यांची काळजी नको. बरेचदा आपण पाहतो की बस मध्ये जागा मिळाली नाही की काही सुटून जातात. तेव्हा ते आपली नाराजी नोंदवितात.
बस मागे धावत दगड मारत सुटतात. म्हणून सोडून द्या. पुढे त्यांनी सभेबाबत एक मोलाचा सल्ला दिला. मोठ्या सभापेक्षा लहान सभा घ्या. मोठ्या सभा आयोजित केल्या जातात तेव्हा तेच ते कार्यकर्ते इकडून तिकडे जातात. गाड्यांनी आणावे लागतात. म्हणून गावात लहान लहान सभा स्थानिक पातळीवार आयोजित कराव्या, असा हितोपदेश फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केला.भाजपचा माहोल तयार झालाच आहे, तो लहान पातळीवार पोहचवावा. ही लढाई बूथ वर लढायची आहे. तिथेच लक्ष केंद्रित करा,असेही ते म्हणाले. आमदारांना पण बोलण्याची संधी देण्यात आली होती. मात्र आ, दादाराव केचे कामांचा रटाळ पाढा वाचत सुटल्याचे दिसून येताच त्यांना उपेंद्र कोठेकर यांनी रोखत मुद्द्याचे बोला आणि आवरा, असे सांगावे लागले.
आणखी वाचा- सोलापूरच्या स्वामींचा नागपूरमध्ये अर्ज, म्हणाले “उमेदवारी गडकरींना…”
मात्र त्यांनी बराच वेळ घेतल्याने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना भाषण आटोपते घ्यावे लागले. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी ९९ शक्ती केंद्रावर ९९ सभा घेण्याचे नियोजन असल्याचे सांगत सहाही विधानसभा क्षेत्रापैकी सर्वाधिक मतधिक्य तडस यांना वर्धा मतदारसंघात मिळेल अशी ग्वाही दिली. आमदार प्रताप अडसड, खासदार अनिल बोन्डे, रामदास तडस, रामदास आंबटकर,राजेश बकाने, समीर कुणावार, सुमित वानखेडे,सुनील गफाट प्रामुख्याने उपस्थित होते.१७० समिती सदस्यांची हजेरी लागली.