लोकसत्ता टीम

नागपूर : सोमवार १७ मार्च रोजी नागपुरात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधार फहीम शमीम खान याला अटक केली आहे. या हिंसाचारामागे सुनियोजित कट असल्याचा दावा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून, फहीम खान याच्यावर जमावाला भडकवून हिंसा घडवल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५० हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून, फहीम खानला न्यायालयाने २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या मते, फहीम खानने १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ३० ते ४० जणांचा जमाव गोळा करून गणेशपेठ पोलीस ठाण्यात निवेदन दिले होते. यावेळी त्याने विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली.

पोलिसांचा दावा आहे की, फहीम खानने यावेळी की चिथावणीखोर वक्तव्यं करत आंदोलनकर्त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केले. त्याच्याच नेतृत्वाखाली जमावाने जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक केली, ज्यात ४० हून अधिक पोलीस जखमी झाले. याशिवाय, एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्नही जमावाने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोण आहे फहीम खान?

फहीम शमीम खान हा ३८ वर्षीय स्थानिक राजकीय नेता असून, तो मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमपीडी) या पक्षाचा नागपूर शहर अध्यक्ष आहे. त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. फहीम खानने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. यात त्याला १०३७ मते मिळाली असून त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.

या पराभवानंतर तो स्थानिक पातळीवर राजकारणात सक्रिय झाला आणि आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत होता. फहीम खान हा यशोधरा नगर येथील रहिवासी आहे. तो बुरखा विक्रीचे काम करत होता तर त्याचे वडील सिलेंडर दुरुस्तीचे काम करतात. फहिम अध्यक्ष असलेली मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी ही छत्तीसगड आणि मध्यप्रदेश येथील सुन्नी युथ फोर्स सोबत संलग्नित आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फहीम खानने केला होता हा आरोप

फहीम खानने पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर एक कथित प्रक्षोभक व्हिडिओ शूट केला. ज्यामध्ये उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना संरक्षण दिल्याचा आरोप पोलिसांना केला गेला. अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांवर त्यांनी आरोप केला. हा व्हिडिओ शहरात व्हायरल झाला, ज्याने जातीय भावना भडकवल्याचा दावा पोलिसांनी केला. पोलिसांचे म्हणणे आहे की, खानच्या व्हिडिओचा ध्रुवीकरणात्मक परिणाम झाला. ज्यामुळे महालमध्ये दंगल घडली.