अमरावती : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे जिल्ह्यातील आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून नवा सामना रंगला आहे. बच्चू कडूंनी अमरावतीच्या जागेवर दावा केला असताना त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे संभाव्य उमेदवार म्हणून सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वैद्य यांचे नाव चर्चेत आले आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नवनीत राणा यांच्या विरोधात यावेळी महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी केली जात असतानाच बच्चू कडूंनी दावा सांगून राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढवल्या आहेत. प्रहारतर्फे रवींद्र वैद्य यांचे नाव समोर आले आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे माजी विद्यार्थी असलेले रवींद्र वैद्य हे ‘वऱ्हाड’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. गेल्या दोन दशकांपासून वऱ्हाड ही संस्था कारागृहातील कैद्यांना आधार देण्याचे काम करीत आहे.
वऱ्हाड संस्थेच्या माध्यमातून हजारो बंदीजणांना मदत झाली आहे. सामाजिक चळवळीत काम करणारे रवींद्र वैद्य यांनी निवडणूक लढण्याची इच्छादेखील प्रदर्शित केली आहे. नवनीत राणा या भाजपाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढणार की, भाजपाच्या पक्षचिन्हावर हे अद्याप ठरलेले नसले, तरी भाजपा-शिंदे गट त्यांच्या सोबत राहील, याचे संकेत मिळाले आहेत.
हेही वाचा – अमरावती : घोषणेत अडकले रिद्धपुरातील मराठी विद्यापीठ; समितीची स्थापना कधी? वाचा सविस्तर…
गेल्या वेळी नवनीत राणा यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे शिंदे गटात सामील झाले आहेत. मात्र, महायुतीत सहभागी असलेल्या बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यासोबत भाजपाचीही डोकेदुखी वाढवली आहे. निवडणुकीपर्यंत काय घडामोडी घडतात, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.