नागपूर : शहरातील सराफा व्यापाऱ्यांना कोट्यवधीने फसविणारा ठगबाज आरोपी राहुलकुमार खाबीया उर्फ जैन (रा. नलावडे ले आउट, प्रतापनगर) याच्याविरुद्ध शहरात अनेक ठिकाणी कोट्यवधीनेे फसवणुक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, नागपूर पोलिसांच्या हाती तो सापडत नव्हता. नुकताच मुंबई पोलिसांनी राहुल खाबीयाला २६ लाखांच्या फसवणूक प्रकरणात अटक केली. यावरुन नागपूर पोलिसांची राहुल खाबीयावर कृपादृष्टी असल्याचे दिसून येते.
त्रिमूर्तीनगर येथील रहिवासी फिर्यादी जयंत पालकर (४९) हे सराफा व्यवसायी असून त्यांचे संभाजीनगर, प्रतापनगर येथे श्री.सप्तश्रृंगी ज्वेलर्स या नावाने सोन्या-चांदीच्या दागिण्यांचे दुकान आहे. आरोपी राहुलकुमार खाबीया याची ॲग्रीयम कार्पोरेशन या नावाने कंपनी आहे. त्यांनी फिर्यादीच्या दुकानातून नगदी रक्कम देऊन लाखोंचे सोन्याेचे दागिने खरेदी केले. अशा पध्दतीने तो नेहमीच रोख रक्कम देऊन दागिने खरेदी करीत होता. एकाच वेळी तो पंधरा लाखांची रोख देऊन दागिने खरेदी करीत होता. त्यांचा सुरळीत व्यवहार सुरू होता तसेच आरोपी हा नेहमीचा ग्राहकही बनला होता. त्यामुळे पालकर यांचा त्याच्यावर विश्वास बसला. दरम्यान आरोपी राहुलने त्यांच्याकडून १ फेब्रुवारी २०२४ ते ४ मार्च २०२५ पर्यंत टप्याटप्याने दोन किलो १४८ ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी केले. विश्वास बसल्याने फिर्यादीनेही त्यांना पैशासाठी आग्रह धरला नाही. हीच संधी साधून आरोपीने त्यांचा विश्वासघात केला. त्यांना उपरोक्त दागिण्यांसाठी धनादेश दिला. मात्र, पैसे थांबविले. पालकर यांनी विचारपूस केली असता आरोपीने दुसरा धनादेश दिला. त्या धनादेशाची रक्कम जमाच झाली नाही. बँकेत रक्कम नसल्याने धनादेश वटत नसल्याचे फिर्यादीने आरोपीला सांगितले. दोन कोटींची रक्कम असल्याने अखेर पालकर यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी राहुल जैनवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. कोट्यवधीचे प्हेरकरण असल्यामुळे तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात राहुल जैनला नागपूर पोलिसांनी अटक केली नव्हती. तो पोलिसांच्या हाती सापडत नव्हता.
मुंबईत अटक आणि नागपुरात अभय !
राहुल जैन याने जयंत पालकर यांच्यासह अविश वस्तानी यांच्या शंकरनगरातील दास ज्वेलर्समधूनही १ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी करुन फसवणूक केली होती. कोट्यवधीने फसवणूक करणाऱ्या राहुलला नागपूर पोलिसांनी अटक केली नव्हती. मात्र, मुंबई पोलिसांनी २६ लाखांच्या गुन्ह्यात राहुल जैनला अटक केली, हे विशेष.
२००९ पासूनच गुन्हेगारीत सक्रिय
आरोपी राहुल खाबीया याच्याविरुद्ध २००९ मध्ये पहिला फसवणुुकीचा गुन्हा अंबाझरीत दाखल झाला होता. तेव्हापासूनच तो अनेकांची आर्थिक फसवणूक करीत आहेत. नुकताच त्याने मुंबईतील व्यापाऱ्याची फसवणूक केली. हा आरोपी मोकाट राहिल्यात संपूर्ण महाराष्ट्रात फसवणूक करु शकतो, अशी शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.
आरोपी राहुल खाबीयाविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्याने अटकपूर्व जामीन घेतला आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली नाही. फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास सुरु आहे.- अभिजीत पाटील (सहायक पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा)