यवतमाळ: सासरच्या मंडळीनी एका विधवा महिलेस गुजरात येथे विकल्याचा संतापजनक प्रकार आर्णी जवळील देऊरवाडी पुनर्वसन येथे उघडकीस आला आहे. पीडित महिलेचा हा सौदा दोन वर्षांपूर्वी झाला होता. परंतु, बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असताना ती पोलिसांच्या हाती लागली. या प्रकरणी वर्षा सूरजोशे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या चार मंडळींसह अन्य दोघांवर गुन्हे दाखल केले आहे.
आर्णी येथील ४२ वर्षीय महिलेच्या पतीचे आकस्मिक निधन झाले.त्यानंतर एकाकी पडलेल्या विधवेला सासू, सासूचा दुसरा पती, दीर व नणंद यांनी संगनमत करून गुजरात येथे विकण्याचा कट रचला. तेथील सुरेश पोपटभाई चौसानी याच्याशी एक लाख २० हजार रुपयात तिची विक्री करण्यात आली, अशी कबुली पीडित महिलेने पोलिसांपुढे दिली आहे. या प्रकरणी सासू दर्शना (६०), सासूचा दुसरा नवरा गणेश नामदेव भेले (६५) तसेच दीर संदीप सुभाष सुरजोशे (४०) तिघेही रा. ग्रीन पार्क, आर्णी यांच्यासह पूजा जितेंद्र पाटीदार (३८), जितेंद्र कैलास पाटीदार (४५) दोघेही रा. मनावर, मध्य प्रदेश तसेच सुरेश पोपटभाई चौसानी (४८) रा. हिरापूर ता. टंकारा, जिल्हा मोरंबी, गुजरात अशी आरोपींची नावे आहेत.
फेब्रुवारी २०२३ पासून ही महिला आर्णी येथून बेपत्ता होती. त्यामुळे तिचा शोध पोलीस घेत होते. मात्र सुरेश यानेही तिला दुसऱ्या व्यक्तीला विकल्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले. दुसऱ्या खरेदीदाराने तिला तेथून सोडून दिल्यानंतर पीडितेने पोलिसांपुढे आपली आपबिती कथन केली. तब्बल दोन वर्षे सुरेश तिचे शोषण करीत होता. इतकेच नव्हेतर तिला एका खोलीत बंद करून मारहाणसुद्धा करायचा, असा आरोप पीडित महिलेने पोलिसांपुढे केला आहे. मागील दोन वर्षांपासून ही महिला बेपत्ता होती. पोलिसात तशी तक्रार दाखल होती. परंतु, सासरच्या मंडळींनी ती निराधार झाल्यानंतर तिला गुजरात येथे विकल्याचे बिंग फुटले आहे. दोन मुलांना दोन वर्षांपासून पाहिले नाही. सासरच्या लोकांचे ऐकून मी तेथे जाण्यास तयार झाले, असा जबाब तिने आर्णी पोलिसांपुढे नोंदविला आहे. सुरेश याने पीडित महिलेला तेथून जवळ असलेल्या हिरापूर येथील एका व्यक्तीला पुन्हा विकले. त्याच्यापुढे पीडित महिलेने आपली व्यथा मांडली. तिच्या विनवणीनंतर त्याने तिला सोडल्याचे ती आपल्या बयानात सांगत आहे. त्याने सोडून दिल्यानंतर हे विक्री प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. या प्रकरणात नणंद व तिचा नवऱ्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुढे आले. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत देशमुख करीत आहे