अकोला: कौटुंबिक कलह व सततच्या छळाला कंटाळून पत्नी व मुलाने फावड्याने मारहाण करून पतीचा जीव घेतला. अपघात असल्याचा बनाव आरोपींनी रचला होता. मात्र, तब्बल २६ दिवसांच्या तपासानंतर जुने शहर पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. रमेश सातरोटे (५२) असे मृतक, तर शिला रमेश सातरोटे (४२) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. मुलगा हा अल्पवयीन आहे.
जुने शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, रमेश सातरोटे यांचा मृत्यू दारूच्या नशेत पडून झाल्याचे पत्नीने पोलिसांना सांगितले. उत्तरीय तपासणीसाठी पत्नीचा विरोध आणि नातेवाईकांना संशय आल्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. वैद्यकीय अहवालात मृत्यू सामान्य नसून गंभीर जखमी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांची चक्र वेगात फिरवली. पोलिसांनी संशयातून शिला सातरोटे आणि तिचा अल्पवयीन मुलगा यांची सखोल चौकशी केली. अखेर त्यांनी हत्येची कबुली दिली.
घटनेच्या दिवशी रमेश दारू पिऊन पत्नीला मारहाण करत होता. सततच्या त्रासाला कंटाळून मुलाने फावड्याने वडिलांवर गंभीर वार केला. पत्नीने देखील मारहाण केली. यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण, वैद्यकीय अहवाल, आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हा उघडकीस आणला. अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले असून, शिला सातरोटेला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू
शहरात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले. दरम्यान, रस्त्यावरील खड्डयात साचलेल्या पाण्यात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रोहित धर्मराज संदलकर असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खड्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केला आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभार आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी देखील त्यांनी केली.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरातील विविध भागात मोठे नुकसान झाले. नाले साफ सफाईअभावी रस्त्यावर नालीचे पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रोहित संदलकर यांच्या मृत्यू प्रकरणी महापालिका प्रशासनाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी साजिद खान पठाण यांनी केली. उत्तरीय तपासणी अहवालानंतरच मृत्यूचे मूळ कारण समोर येईल.