भंडारा : पवनी शहरातील बेलघाटा वार्डातील एका पडक्या घरात अस्वल असल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले. सोबतच शीघ्र बचाव दल भंडारा यांना पाचारण करण्यात आले. मात्र शीघ्र बचाव दल रात्री ११ च्या दरम्यान पोहचल्यामुळे वार्डातील जनतेला तब्बल तीन तास अस्वलाच्या दहशतीखाली राहावे लागले.
बेलघाटा वार्ड पवनी वनविभागाचे धानोरी नियत क्षेत्रात येत असून पवनी शहर हे जंगल व्याप्त गावांना लागून असल्यामुळे वन्यप्राणी गावात येण्याची भीती निर्माण झाली आहे. अस्वल कुऱ्हाडा तलावाच्या पाळीने गावात आली असावी, असे सांगण्यात येत असून अस्वलाने हिरालाल श्रावण हटवार यांच्या घरातील पडक्या बाथरूममध्ये आसरा घेतला. याची माहिती वनविभागाचे अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र, अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उशिरा आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.
रात्री उशिरा ११.३० वाजता दरम्यान भंडारा येथील शीघ्र बचाव दल घटनास्थळी दाखल होवून अस्वल दबा धरून बसलेल्या पडक्या बाधरूमची पाहणी करून पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. ११.४५ च्या दरम्यान अस्वलाला पिंजऱ्यात पकडण्यात शीघ्र बचाव दलाला यश प्राप्त झाले.
अस्वलाला पकडून रात्रीच निसर्गाच्या सानिध्यात सुखरूप सोडण्यात आले. अस्वल पकडण्याची मोहीम भंडारा येथील उपवनसंरक्षक योगेंद्र सिह यांचे मार्गदर्शनाखाली मानद वन्यजीव रक्षक पंकज देशमुख, पवनीचे वन परिक्षेत्र अधिकारी वृषाली नागदेव, वन रक्षक सचिन कुकडे, निलेश श्रीरामे, कोदाने, भुसारी, वाहन चालक अनिल शेळके जीवशास्त्रद्य शुभम मोदनकर , तसेच पवनी शीघ्र बचाव दलाचे सदस्य व मैत्रचे उपाध्यक्ष नामदेव मेश्राम, गजानन जमले, मुकेश जांभुळकर, जागेश्वर कांबळे, पीआरटी सदस्य उमेश दलाल, धीरज बोरूले यांच्यासह भंडारा शीघ्र बचाव यांनी पार पाडली.
शहरात वन्यप्राणी येण्याची दुसरी वेळ..
मागील पंधरा दिवसांपूर्वी वैजेश्वर मंदिर परिसरकडून जंगली डुक्कर याने शहरात प्रवेश करून नेताजी चौकातील हार फुलाचे दुकान लावणाऱ्या गरीब दुकानदाराला गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. पंधरा दिवसांतच बेलघाटा वार्डात अस्वल शिरले. वनविभागाने शहरात प्रवेश करणाऱ्या वन्यप्राण्यांवर अंकुश ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
