नागपूर : तुम्ही जिप्सीत बसून वाघ शोधत असाल आणि एका इमारतीच्या पायऱ्यांवरून तुम्हाला वाघ उतरताना दिसत असेल तर कसे वाटणार…? अगदी असाच प्रसंग मध्यप्रदेशातील बांधवगड व्याघ्रप्रकल्पाच्या ताला कोअर झोनमध्ये वन्यजीवप्रेमी तेजस पाळंदे यांना आला.

मध्यप्रदेशातील उमरिया जिल्ह्यात बांधवगड हा व्याघ्रप्रकल्प आहे. वाघांच्या सर्वाधिक घनतेसाठी हा व्याघ्रप्रकल्प ओळखला जातो. भीमा, बमेरा, चांदिनी, कंकटी, राजभेरा, डॉटी कृष्णा, सुखीपाटिया, मार्चैनी अशी अनेक नाव इथल्या वाघांना आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आणि पट्ट्यांच्या खुणांऐवजी, जी जंगलात वाघांना ओळखण्याची सुचवलेली पद्धत आहे, त्यांच्या प्रदेशावरून त्यांना जास्त ओळखले जाते. सध्याच्या काळातील पिल्लांना त्यांचा प्रदेश स्वीकारण्यापूर्वीच नावे दिली जातात. एकेकाळी बांधवगडमधून वाघ जवळजवळ गायब झाले होते. आजच्या घडीला जवळजवळ ६० वाघ या व्याघ्रप्रकल्पात आहेत.

सीता आणि चार्जर या वाघ आणि वाघिणीच्या कथा बांधवगडमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांनी बांधवगडमधील नवीन पिढीतील वाघ कुटुंबे मागे सोडली आहेत, जी वाघ प्रेमींना आकर्षित करणारी आहेत. बांधवगड व्याघ्रप्रकल्पात चक्रधारा वाघिणीच्या चपळतेने पर्यटकांना आकर्षित केले आहे. त्यामुळेच पर्यटक सातत्याने येथे येतात. अनेकदा ती बचड्यांसह दिसते.

तिचा मूड चांगला असेल तर पर्यटकांच्या जिप्सीच्या जवळून जात ती छायाचित्रे घेऊ देते. अलीकडेच या वाघिणीच्या बचड्यांमधील एक पर्यटकांना दिसला. हा मादी बछडा चक्क वनखात्याच्या वॉचटॉवरवर चढलेला होता. जणूकाही वनरक्षकांसोबतच जंगलाच्या रक्षणाची जबाबदारी त्यांचीही असल्यागत तो वॉचटॉवरवर चढून येरझारा घालत होता. पर्यटकांची जिप्सी तेथेच थांबली. थोड्यावेळाने तिला तहान लागली असावी आणि पाणी पिण्यासाठी ती खाली उतरली.

वॉचटावरची उंची बरीच असल्याने जिन्याने उतरण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय या बछड्याकडे नव्हता. हा प्रसंग चित्रित करण्याची संधी सोडणार ते पर्यटक कसले..? तेजस पाळंदे यांनी हा क्षण अचूकपणे कॅमेऱ्यात टिपला. काही महिन्यांपूर्वी ही वाघीण तिच्या तीन बचड्यांसह भ्रमंतीला निघाली तेव्हाही तिचा असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर ती एकटीच कित्येकदा पर्यटकांना दिसून आली. तर आता तिच्या मोठ्या होत असलेल्या बछड्याने चक्क वॉचटॉवरवर चढून आईप्रमाणेच पर्यटकांना वेड लावले आहे.